कला विश्वात दाखल होण्यासाठी तुम्हाला कलेची पार्श्वभूमी असावी लागते असे म्हटले जाते. संगीत क्षेत्रात यायचे असेल तर तुम्हाला आईवडिलांचा वारसा मिळायला हवा. किंवा अभिनय क्षेत्रात यायचे असेल तर दोघांपैकी कोणालातरी त्याची आवड असणे आवश्यक असायला हवे असे म्हटले जाते. पण आता ज्याला ज्या क्षेत्राची ओढ आहे त्याने त्या क्षेत्रात आपले नशीब आजमावावे असा सर्रासपणे विचार पुढे येऊ लागला आहे. अशातच अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिच्या घरी संगीत वाद्य बनवण्याचा व्यवसाय आहे. मात्र तिने करिअर म्हणून अभिनय क्षेत्राची वाट निवडलेली पाहायला मिळाली. गौरी कुलकर्णी सध्या अबोली या लोकप्रिय मालिकेत अबोलीची प्रमुख भूमिका साकारत आहे.
रांजण या चित्रपटातून गौरीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण या मालिकेमुळे तिला चांगली लोकप्रियता मिळाली होती. गौरी कुलकर्णी ही मूळची अहमदनगरची. कुलकर्णी घराणं हे परंपरागत संगीत वाद्य बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करत आहेत. १९६५ साली आर बी कुलकर्णी म्हणजेच रामचंद्र बापूराव कुलकर्णी यांनी संगीत वाद्य विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील हे संगीत प्रेमींसाठी एक नावाजलेलं दालन आहे. नुकतेच या दालनाचे नूतनीकरण करण्यात आले असून यात अनेक प्रकारची विविध वाद्य तुम्हाला एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी मिळणार आहेत. हार्मोनियम, गिटार, तबला, ढोल अशी सर्व वाद्य या दालनात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
रविवारी ११ फेब्रुवारी रोजी या प्रशस्त दालनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. गौरीने तिच्या या नव्या दालनाचे खास वैशिष्ट्य व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहे. महाजन गल्ली, गांधी मैदानाजवळ, अहमदनगर जिल्ह्यात हे प्रशस्त आणि भव्य दालन संगीत प्रेमींसाठी सज्ज झालेलं आहे. सचित पाटील, सुयश टिळक, रेशम टिपणीस यांनी गौरीच्या कुटुंबियाला या नवीन दालनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या नवीन दालनाबद्दल गौरी लिहिते की, सस्नेह नमस्कार, नगरच्या ‘संगीतवाद्य’ क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मे आर बी कुलकर्णी हार्मोनियम मेकर्स अँड तबला मर्चंट. या दालनाच्या विस्तारित नवीन वास्तू मधे संगीत क्षेत्रातील सर्व संगीत साधकांना सर्व संगीत वाद्य एका छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. तो उपलब्ध करून देताना अगदी प्रशस्त जागेत, सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या मॉल संस्कृती मधे आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.