महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने अनेक कलाकारांना आर्थिक दृष्टीने स्थिरस्थावर केले आहे. गौरव मोरे हाही त्यातलाच एक. आर्थिक परिस्थिती अतिशय खडतर असलेल्या गौरव मोरेचा स्ट्रगल काळ आणि त्याच्या बालपणाच्या अनेक गोष्टी त्याने नुकत्याच एका मुलाखतीतून उलगडल्या आहेत. तू आयुष्यात काहीच करू शकणार नाही असे लोक गौरवला म्हणायचे, पण यावर तो गप्प असायचा. आपल्या कृतीतून आपण ते लोकांना दाखवून द्यायचं हा त्याचा विचार असायचा. उल्हासनगरला स्टेशनजवळ ताडपत्रीच्या घरात गौरवचे बालपण गेले पुढे त्याचे कुटुंब फिल्टर पाडा मध्ये वास्तव्यास आले.
इथे जागा पकडून त्यांनी ताडपत्रीच घर उभारलं. सहलीला जावं एवढीही त्यांची अर्थिक परिस्थिती नव्हती. पण फी वर्षाच्या शेवटी द्या म्हणून शिक्षकांनी सहकार्य दाखवलं तेव्हा गौरव सहलीला जाऊ लागला. खर्चाला आईने दिलेले दहा रुपये तो आहे तसे परत घेऊन यायचा. कारण या पैशात आपण काय घ्यायचा एवढंच तो विचार करायचा. शाळा शिकून नोकरी करावी असा आईचा आग्रह असल्याने सातच्या आत घरात असेच त्याचे शिक्षण झाले. यामुळे वाईट संगत लागली नाही असे गौरव म्हणतो. पुढे कॉलेजमध्ये असताना एकांकिका म्हणजे काय हे त्याला कळलं तेव्हा आपण हेच करायचं हे त्याने पक्क केलं होतं. यातूनच पुढे गौरव नाटकातून काम करू लागला. ऑडिशनला जायचं तर जवळ पुरेसे पैसे नसायचे. एकदा जवळ पैसे नसल्याने मी वडाळा ते फिल्टरपाडा चालत घरी गेलो होतो असे तो सांगतो.
गौरवने दिलेल्या या मुलाखतीत कुठेही अतिशयोक्ती वाटली नाही, की त्याला गर्व आहे असेही वाटले नाही. अतिशय विनम्रपणे तो आपल्या स्ट्रगल काळातले हे किस्से या मुलाखतीत सांगताना दिसतो. हास्यसम्राट च्या दुसऱ्या सिजनमध्ये गौरव पहिल्यांदा टीव्हीवर झळकला तेव्हा त्याचे काम पाहून अनेकांनी त्याचे मोठे कौतुक केले होते. नाटकापासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे फळाला आला. यामुळे त्याला लहान लहान मुलं सुद्धा ओळखू लागले आहेत. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी सगळ्यांनाच स्ट्रगल करावा लागतो पण डाऊन टू अर्थ म्हणजे नक्की काय हे गौरवने त्याच्या कृतीतून कायमच दाखवून दिलेलं आहे. स्किटमध्ये सगळ्यात जास्त अपमान करून घेणारा कलाकार ही नवी ओळखही त्याने बनवुन घेतली आहे.