महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला दत्तू मोरे उर्फ दत्ता मोरे आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. दत्तू मोरे हा मूळचा ठाण्याचा. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामनगर भागात तो एका चाळीत राहत होता. आपले संपूर्ण बालपण या चाळीतच घालवलेल्या दत्तूला चाळकऱ्यांनी त्याला एक सुख धक्का दिला आहे. या चाळीला ‘दत्तू चाळ’ हे नाव देण्यात आल्याने तो खूपच खुश झाला आहे. चाळीला आपलं नाव लागणं आपल्या नावाने ती चाळ ओळखली जाणं ही खरं तर मोठी भाग्याची गोष्ट आहे असे तो याबाबत म्हणतो. दत्तू ज्या चाळीत राहत होता त्या चाळीला गेल्या अनेक वर्षांपासून कुठेही नाव देण्यात आले नव्हते.
शेजारी असलेल्या काहीतरी खुणेवरून या चाळीला ओळखले जायचे. दत्तू कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करत असे. कधी बॅकस्टेजला काम करणारा दत्तू स्टेजवर शिताफीने प्रेक्षकांच्या मनात घर करू लागला. अनुभूती या नाट्यसंस्थेच्या नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. आयुष्य, हिया, बाला ही त्याने गाजवलेली नाटकं प्रशंसनीय ठरली. एकांकिका, नाट्यस्पर्धात त्याने सहजसुंदर अभिनयाची झलक दाखवून दिली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे दत्तू मोरे नावारूपाला आला. या शोमधून तो वन अँड ओन्ली दत्तू मोरे नावाने ओळखू लागला. नुकतेच त्याने बॉस माझी लाडाची सीरिअल मध्ये छोटीशी भूमिका साकारली आहे. त्याच्या यशाचा हा आलेख चढताच राहिल्याने चाळकऱ्यांनी दत्तूचे मोठे कौतुक केले.
आपला दत्तू महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये झळकतोय हे कळल्यावर चाळकऱ्यांनी तो चॅनल पहायला सुरुवात केली. चाळकऱ्यांनी त्यांच्या चाळीला दत्तू चाळ असे नाव देऊ केले. यावर दत्तू खूपच भारावून गेला आहे, ही बातमी त्याच्या सहकलाकारांना कळली तेव्हा सगळ्यांनी त्याचे मोठे कौतुक केले. ज्यांना पाहून आपण लहानाचे मोठे झालो त्यांच्या स्तुतीने दत्तू खूपच भावुक झाला होता. सध्या हास्यजत्रेने सोनी मराठी वाहिनीवरून तात्पुरता ब्रेक घेतला आहे. काहीच दिवसांपूर्वी या संपूर्ण टीमने लोणावळ्याला एक ट्रिप साजरी केली. ज्यात या टीमने प्रेक्षकांच्या समोर नवीन काहीतरी घेऊन येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो तुम्हाला एका नव्या रुपात आणि नव्या ढंगात पाहायला मिळणार आहे.