दोन दिवसांपूर्वी एका हळदीच्या कार्यक्रमात गायक संतोष चौधरी म्हणजेच दादूसने हवेत गोळीबार केलेला होता. याप्रकरणी त्याला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. कॉमेडीची बुलेट ट्रेन शोमधील वादक सचिन भांगरे याच्या हळदीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला होता. सचिन भांगरे विवाहबंधनात अडकणार होता. त्याच्या हळदीला त्याने संतोष चौधरीला आमंत्रित केले होते. संतोषने कार्यक्रमात हळदीची गाणी आणि काही कोळीगीत गायली होती. अशाच उत्साहाच्या भरात दादूसने जवळ असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार करत एकच धमाल उडवून दिली. त्याचा गोळीबार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली.
या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलिसांनी सचिन भांगरेच्या घरी धाव घेतली होती. मात्र लग्नानिमित्त सगळी मंडळी गेली असल्याने कोणाशीच भेट झाली नाही. अखेर पोलिसांनी दादुसला चौकशीसाठी बोलावले तेव्हा ही पिस्तुल खोटी असल्याचे स्पष्टीकरण संतोष चौधरी कडून मिळाले. सखोल चौकशी केल्यानंतर दादूसला निर्दोष सिद्ध करण्यात आले. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दादूसवर टीका होत होती. एक जबाबदार व्यक्ती असे कृत्य कसे काय करू शकते म्हणून संतोषला अनेकांनी जाब विचारला. मात्र पिस्तुल खोटी असल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. चाहत्यांशी संपर्क साधताना दादूसने याबाबत माफी मागितली आहे. सोबतच या प्रकरणाबद्दल त्याने असे म्हटले आहे की, व्हायरल होणाऱ्या व्हडिओत माझ्या हातात जी रिव्हॉल्व्हर होती ती खोटी होती.
खोट्या रिव्हॉल्व्हर मधून फक्त आवाज ऐकायला येतो. त्याला स्टार्टर रिव्हॉल्व्हर म्हणतात. माझ्या मित्राच्या लग्नाखातर मी कार्यक्रमात गेलो होतो. पोलिसांनी सुद्धा ती रिव्हॉल्व्हर खोटी असल्याचे सिद्ध केले आहे. त्यातून फक्त आवाज येतो कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही अशी ती रिव्हॉल्व्हर आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून माझ्याबाबत गैरसमज झाला. माझं नाव लौकीक झालं ते तुमच्यामुळे आहे . मीडियाला सुद्धा विनंती आहे की माझ्याकडची ती रिव्हॉल्व्हर खोटी आहे त्यातून कोणालाही हानी होत नाही, माझा तो व्हिडीओ तुमच्याकडे आला तर कृपा करून व्हायरल करू नका. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या पोलिसांनी माझ्या रिव्हॉल्व्हरची पाहणी केलेली आहे त्यातून ती खोटी असल्याचे सिद्ध झालं आहे. असे म्हणत दादूसने सर्वांची जाहीरपणे माफी मागितली आहे.