स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा रिऍलिटी शो प्रसारित केला जात आहे. या रिऍलिटी शोमध्ये महागुरू सचिन पिळगांवकर आणि गायिका वैशाली सामंत हे परीक्षकांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि बाल कलाकार अवनी जोशी या शोचे सूत्रसंचालन करत आहे. काही दिवसांपूर्वी या शोमधील स्पर्धकाला १०, ९ आणि ९ असे एकूण २८ गुण मिळालेले असतात. ट्वेन्टी एट एवढे गुण मला मिळाले असल्याचे सिद्धार्थ सांगतो.
त्याचवेळी तो ट्वेन्टी एटला मराठीत काय म्हणतात म्हणून तिची फिरकी घेतो. यावर अवणीने त्याचे उत्तर दिले मात्र सिध्दार्थने अवणीला ८६ म्हणजे किती? असे विचारले त्यावेळी ती खूप गोंधळात पडलेली दिसली. मात्र ह्या चिमुकल्यांच्या निरागसपणावर सगळ्यांनीच खिल्ली उडवली. अर्थात ह्या सर्व गमतीजमतीत चाललेल्या संवादावर अभिनेत्री चिन्मई सुमितने एक पोस्ट लिहित हा मुद्दा गांभीर्याने विचारात घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. चिन्मई सुमित या मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेत्री आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठी शाळा टिकून राहाव्यात यासाठी त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आवाहन केले होते. त्यामुळे मराठी रिऍलिटी शोमधील हे चित्र पाहून त्या या गोष्टीला हात घालताना दिसत आहेत.
रिऍलिटी शोमधील हा एक व्हिडिओ त्यांच्या पाहण्यात आला आणि त्या व्हिडिओबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी रोखठोक मत मांडत मराठी शाळा बंदच करून टाका अशी एक खंत व्यक्त केली आहे. ‘हे रील पाहून तुम्हाला कदाचित, कदाचित कशाला हमखास हसू येणार आहे. पण हळू हळू असंच होणार आहे. मराठी आकडे, मराठी स्वर, व्यंजनं, मुळाक्षरं सारीच विस्मरणात जाणार आहेत. वेष कसा असावा, खावं प्यावं काय, कुणाचे पुतळे, कुणाचे जयजयकार, खरा इतिहास, खोटा इतिहास, चुकीचा इतिहास ह्यावर संस्कृतीचा ठेका घेऊन वादंग माजवणारे लोक मराठीबद्दल काहीच भूमिका का घेत नाहीत? इतका उबग आलाय आता. आता सरकारने एक आदेश काढून एका फटक्यात बंदच करुन टाकाव्यात मराठी शाळा…’