मंगेश हाडवळे दिग्दर्शित ‘टिंग्या’ चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. ग्रामीण भाषेचा बाज असलेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. तर बालकलाकार टिंग्या म्हणजेच शरद गोयकरला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. टिंग्या चित्रपटामुळे नावारूपाला आलेला शरद पुढे बालकलाकार म्हणून कोणत्या चित्रपटात झळकला नाही. आपल्या शिक्षणावर लक्ष्य केंद्रीत करीत सिंहगड पब्लिक स्कूल आणि पुढचे शिक्षण पूणे युनिर्व्हसिटीतून पूर्ण केले. सह्याद्री व्हॅले या कॉलेजमधून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली.
त्यानंतर शरद किचन ट्रॉलीच्या व्यवसायाकडे वळला. मात्र आभिनय क्षेत्राची ओढ शरदला स्वस्थ बसू देत नव्हती. यातूनच तो ब्रह्मवाणी वाग्देवाची या चित्रपटामध्ये झळकला. एवढेच नव्हे तर त्याने बब्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी तो माझ्या प्रेमा या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाद्वारे त्याने एक अभिनेता म्हणून दहा वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केलेले दिसले. शरद गोयकर आता आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी ‘जेता’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. संजू एंटरटेनमेंट बॅनरखाली संजय यादव यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. योगेश महाजन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
काल छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याहस्ते चित्रपटातील ‘धाव मर्दा धाव’ या गाण्याचे अनावरण केले. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून, सर्वांच्या मनात एक नवी उमेद जागवणारं ठरलं आहे. चित्रपटाचे कथानक हे सत्य घटनेवर आधारित आहे. एका तरुणाची दैवाशी संघर्षाची कथा दाखवण्यात आली आहे. नितीश चव्हाण आणि स्नेहल देशमुख हे कलाकार या चित्रपटात संजय आणि स्नेहलच्याच प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. टिंग्या म्हणजेच शरद गोयकर नायकाच्या मित्राची म्हणजेच संतोषची भूमिका साकारत आहे. अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनवणे डावरे, संकेत ननावरे, श्रिया कुलकर्णी, सुदिन तांबे, राम जाधव, विनोद नराळे. प्रेम नरसाळे, स्वाती प्रभू अशी कलाकार मंडळी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
चित्रपटाचे कथानक संजय जाधव यांनी लिहिले असून योगेश सबनीस यांच्या साथीने त्यांनी चित्रपटातील संवाद लेखन केले आहे. या चित्रपटातून नितीश चव्हाण पुन्हा एकदा मुख्य नायक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याअगोदर सोयरीक या चित्रपटातून तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. जेता चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आणि सर्वांच्या लाडक्या टिंग्या म्हणजेच शरद गोयकरला या नवीन भूमिकेसाठी कलाकार टीम कडून खूप खूप शुभेच्छा.