स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे हिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेअगोदर तिने अस्मिता मालिकेत काम केले होते. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सुरू झाल्यानंतर गुप्तहेराच्या भूमिकेसाठी तिने एक ऑडिशन दिली होती. पण ऑडिशनवेळी दिग्दर्शक विवेक देशपांडे यांना अश्विनीचं काम इतकं आवडलं की त्यांनी छोटी भूमिका देण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भगिनी राणूअक्काची भूमिका तिला देऊ केली. या भूमिकेमुळे अश्विनी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. या भूमिकेमुळे सेटवर एका आजीने अश्विनीला चक्क मिठी मारली होती.
त्या आजी तिला रडतच म्हणाल्या होत्या की, माझ्या राजाला परत स्वराज्यात आण. अश्विनी महांगडे हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. अभिनय क्षेत्रातील प्रवास, नैराश्यामुळे घेतलेला आत्महत्येचा विचार अशा सर्वांवर ती भरभरून बोलली. राणूअक्काच्या भूमिकेचा तिच्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला. या भूमिकेमुळे तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. याबद्दल ती म्हणते की, आज ९० वर्षांच्या आजी रायगडावर शिवजयंती किंवा राज्याभिषेक सोहळा साजरा करायला जातात ही ऊर्जा कुठून येते त्यांच्यात. एकीकडे असे अनुभव पण दुसरीकडे काहीजण असेही म्हणतात की, काय तुम्ही सारखे शिवाजी महाराज शिवाजी महाराज करत असता. इतक्या वेगवेगळ्या विचारांची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यावेळी मला त्यांच्याकडे पाहून हसू येतं.
जर महाराज नसते ना तर तुमची आडनावं मुल्ला, खान अशी काही असती. आता आपण हे सांगतो ना आम्ही बारा बलुतेदार, अठरापगड जाती हे हे आहोत, हे का सांगता तुम्ही? काय राहिलं असतं आपलं? अशा विरोधी बोलणाऱ्यांचा तेवढा अभ्यास नाही, त्यांची तेवढी कुवत नाही. अशा विचारांच्या लोकांना मी महाराजांबद्दल सांगितलं तर ते पॉजिटीव्हली नाही घेणार कारण त्यांना त्यांचे विचार बदलायचे नसतात. मी हे कायम सांगते की आपल्यातला विद्यार्थी मरु द्यायचा नाही. ए मला सांगू नको हं मला सगळं येतं हे असं जेव्हा घडतं तेव्हा तुमच्यातला शिकणारा माणूस संपलेला असतो. ह्या लोकांना सगळं येत असतं म्हणजे ते अमेरिकेत सुद्धा स्वतःची सत्ता स्थापन करू शकतात इतके ते बलाढ्य विचारांचे असतात. त्यामुळे अशा लोकांसमोर आपली एनर्जी कुठे वाया घालवायची. त्यापेक्षा खेडोपाड्यात महाराजांच्या विचारांचे लोक आहेत मी त्यांच्याशी बोलते, यातून त्यांना किती ऊर्जा मिळेल. अश्विनी महांगडे हिचे हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. अनेकांनी तिच्या या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.