चित्रपट, मालिका तसेच नाटकातून काम करत असताना आपल्या सहकलाकारासोबत एक भावनिक नातं जोडलेलं पाहायला मिळतं. ही नाती आयुष्यभर जपण्याची जोपासण्याची कामं नेहमीच प्रत्ययास येतात. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांनी देखील सायली संजीव सोबत असंच एक नातं जोडलं आहे. आपली लेक म्हणून ते सायलीच्या बाजूने नेहमीच उभे असतात. नाटकातून काम करत असताना वंदना गुप्ते यांचं देखील एक भावनिक नातं जोडलं आहे, ते म्हणजे नाटकातील त्यांच्या नातवासोबत. अर्थात हा त्यांच्या नाटकातला नातू म्हणून जरी त्या त्याला ओळखत असल्या तरी, एका आज्जीचं नातं जसं असतं त्याच पद्धतीने त्या त्याच्याशी वागतात.
हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकात वंदना गुप्ते आज्जीच्या भूमिकेत आहेत, तर अथर्व नाकती हा त्यांच्या नातवाची भूमिका साकारत आहे. या नाटकात प्रतीक्षा लोणकर, राजन जोशी आणि दीप्ती लेले यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. नाटकातून आपला नातू बनलेल्या अथर्वने नुकतीच एक गाडी खरेदी केली आहे. आपल्या आजीच्या मागे बसून त्याने वंदना गुप्ते यांना गाडी चालवायला दिली. आज्जी नातवाचा हा गोड क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला. या आठवणी सांगताना वंदना गुप्ते म्हणतात की, गेल्या ५० वर्षांत मी ४० ते ५० नाटकातून काम केले त्यासोबतच अनेक कुटुंबही मी माझ्या जवळ केली आहेत. अजूनही माझ्या पहिल्या नाटकातील नाती मी अशीच बांधून ठेवली आहेत, तेवढयाच प्रेमाने.
अथर्व त्यातलाच एक, खूप प्रेम, आदर आणि साथ देणारा. आणखी काय हवं असतं आयुष्यात? हीच खरी कमाई! असे म्हणत त्यांनी आपल्या नातवाचंही मोठं कौतुक केलं आहे. हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकात अथर्व महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अथर्वला बऱ्याच प्रेक्षकांनी ओळखलंही असेल, कारण तो बालपणापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अथर्व हा मूळचा ठाण्याचा त्याचे वडील किरण नाकती हे अभिनव कट्ट्याचे संस्थापक आहेत. या संस्थेतून त्यांनी अनेक नाटकांचे लेखन तसेच दिग्दर्शन केले आहे. अभिनय कट्ट्याला अनेक बक्षिसं देखील त्याने मिळवून दिली. मालिका, चित्रपट, नाटक एवढेच नाही तर जाहिरात क्षेत्रात देखील अथर्वने बालकलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
स्लॅम बुक, सिंड्रेला, लॉस्ट अँड फाऊंड, मेमरी कार्ड या चित्रपटातही तो महत्वाच्या भूमिका साकारताना दिसला. हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकातून तो गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे वंदना गुप्ते सोबत त्याचे छान सूर जुळले आहेत. आपल्या नातवाने पहिली गाडी खरेदी करून ती आपल्याला चालवायला दिली यातच त्यांना मोठे समाधान आहे. नाती जोडली तर ती आयुष्यभर टिकवण्याचे गमक त्यांनी आपल्या कृतीतून वेळोवेळी दाखवले आहे. हीच खरी कमाई म्हणत त्यांनी हा गोड फोटो शेअर केला. त्यावर सेलिब्रिटींनी देखील कौतुकाचा वर्षाव केला.