लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांचा अशी ही बनवाबनवी हा सुपरहिट चित्रपट अजरामर ठरला. या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या अगदी परिचयाचे बनले आहेत. यात धनंजय मानेचा भाऊ म्हणजेच शंतनूची भूमिका अभिनेता सिद्धार्थ उर्फ सुशांत रे याने साकारली होती. सिद्धार्थ रे याने वयाच्या ४० व्या वर्षीच म्हणजेच ८ मार्च २००४ साली या जगाचा निरोप घेतला होता. मात्र त्याची दोन्ही मुलं आता कला सृष्टीत आपले स्थान निर्माण करू पाहत आहेत. सिद्धार्थ रे चे तेलगू अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत लग्न झाले होते. सौगंध या बॉलिवूड चित्रपटात अक्षय कुमारची पहिली नायिका बनण्याचा मान शांतीप्रिया यांच्याकडे जातो.
याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटात शांतीप्रिया यांनी स्वताची ओळख निर्माण केली आहे. शुभम आणि शिश्या ही दोन अपत्ये दोघांना झाली. शुभम रेला संगीत आणि मॉडेलिंग क्षेत्राची आवड आहे, तर शिश्याने दिग्दर्शनाचे धडे गिरवले आहेत. रायटर म्हणून तो आता हिंदी सृष्टीत स्वताची ओळख निर्माण करताना दिसत आहे. येत्या १ फेब्रुवारी २०२२ रोजी डिजनी हॉट स्टारवर कबीर खुराना दिग्दर्शित Dramayama ही शॉर्ट फिल्म रिलीज होत आहे. या फिल्मचे कथालेखन शिश्याने केले आहे. रिनी सेन मुख्य नायिका तर तारे जमीन पर या गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटातील बालकलाकार दर्शील सफारी या शॉर्टफिल्म मधून मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.
आपल्या मूलाची ही यशस्वी भरारी पाहून शांतीप्रिया यांनी शिश्याचं मोठं कौतुक केलं आहे. सुशांत म्हणजेच सिद्धार्थ रे हा व्ही शांताराम यांचा नातू आहे. व्ही शांताराम यांची मुलगी चारूशिला यांचा विवाह डॉ सुब्रतो रे यांच्याशी झाला होता. व्ही शांताराम यांनी सिध्दार्थला चाणी चित्रपटात बालभूमीका साकारण्याची संधी दिली होती. जैत रे जैत, बाळाचे बाप ब्रह्मचारी, अशी ही बनवा बनवी, वंश, बाजीगर, पिता, जानी दुश्मन, बिच्छु, परवाने अशा चित्रपटातून अभिनय साकारला होता. चरस हा सिध्दार्थने अभिनित केलेला अखेरचा चित्रपट ठरला.