मराठी सृष्टीत सात्विक, सोज्वळ, अन्याय सहन करणारी सोशिक अभिनेत्री म्हणून ओळख बनवली ती ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी. आज आशा काळे यांचा वाढदिवस असून याचे औचित्य साधून त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. आशा काळे यांचा जन्म गडहिंग्लज कोल्हापूरचा. वडील फॉरेस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरीला होते. त्यांना ज्योतिषशास्त्राची माहिती अवगत होती. दर तीन वर्षांनी बदली होत असल्याने अनेक गावांमध्ये त्यांचे वास्तव्य असायचे. अगदी कोकण, पुण्यात नंतर रिटायरमेंटच्या वेळी मूळ गावी म्हणजे कोल्हापूरला बदली झाली होती.
आशा काळे यांचा जन्म झाला तो अमावस्येच्या दिवशी तेही पायाळू, म्हणून आईला त्यांच्याबद्दल खूप काळजी वाटायची. वडिलांनी त्यांची पत्रिका पाहिली, ‘ही अमावस्येची पोर लक्ष्मी होऊन घरात आली, हिची तुळ रास आहे आणि ही कलावंत होणार’ असे त्यांनी सांगितले. आपल्या मुलीने अभिनय क्षेत्रात जावं हे त्यांच्या आईला मुळीच मान्य नव्हते. लहानपणापासून आशा यांना नृत्याची आवड होती म्हणून त्यांनी पुण्यात भरतनाट्यम, कथ्थकचे धडे गिरवले आणि वेगवेगळे कार्यक्रम देखील केले. भारत चीन युद्धादरम्यान मदत निधी गोळा करण्यासाठी व्ही शांताराम यांनी शिवसंभव हे नाटक बसवलं. नाटकातील एका नृत्यासाठी आशा काळे यांना बोलावण्यात आलं. पुढे बाबुराव पेंढारकर यांनी रंगभूमीवर अभिनयाची संधी मिळवून दिली आणि भालजी पेंढारकर यांनी चित्रपटातून काम मिळवून दिले.
आशा काळे यांनी नायिका म्हणून सोज्वळ आणि सात्विक भूमिका निभावल्या आणि त्या गाजल्या देखील. एक रूप अनेक रंग, एखादी तरी स्मितरेषा, गहिरे रंग,गुंतता हृदय हे, घर श्रीमंताचं, देव दीनाघरी धावला. नल दमयंती, पाऊलखुणा, हा खेळ सावल्यांचा, देवता, बाळा गाऊ कशी अंगाई, नशीबवान, आई पाहिजे. कुलस्वामिनी अंबाबाई, थोरली जाऊ अशा नाटक आणि चित्रपटातून त्यांच्या अभिनयाचं कौतुक देखील झालं. आशा काळे यांनी मालिका सृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. डॉ काशिनाथ घाणेकर, अरुण सरनाईक, रविंद्र महाजनी, कुलदीप पवार, विक्रम गोखले अशा अनेक नायकांसोबत त्यांची जोडी जुळली. मात्र आयुष्याची जोडी जुळली ती चित्रपट निर्माते माधव पांडुरंग नाईक यांच्यासोबत.
आशा काळे यांच्या आईला माधव नाईक यांची भुरळ पडली. आईंनी स्वतः पुढाकार घेऊन आशाजींचे लग्न लावून दिले. माधव नाईकांसोबत आपला संसार अत्यंत सुखाचा झाला असे आशा काळे आवर्जून म्हणतात. माझे आई वडील, भाऊ अनिल आणि पती माधवराव अशी माझी जीवाभावाची माणसे आज या जगात नाहीत. पण तितक्याच उत्कटतेने माझ्यावर प्रेम करणारी चांगली माणसे आजुबाजूला आहेत. रसिक प्रेक्षक आजही भरभरून प्रेम करतात. माझ्यासाठी हा खूप मोठा ठेवा आहे. आपल्या अभिनय सृष्टीच्या कारकिर्दीत जेवढ्या भूमिका मी केल्या त्यात मी समाधानी आहे असे त्या आवर्जून उल्लेख करतात.