बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळणारे अनेक कलाकार आहेत. मात्र हे कलाकार पुढे जाऊन खुपच कमी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. मराठी इंडस्ट्रीत देखील असे बरेचसे कलाकार तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातलाच एक म्हणजे अनुराग वरळीकर. २००१ सालच्या देवकी या चित्रपटात अनुराग वरळीकर पहिल्यांदा बालकलाकार म्हणून झळकला होता. या चित्रपटामुळे अनुराग प्रसिद्धी मिळवताना दिसला. हाच अनुराग आता आयुष्याच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करताना दिसत आहे. नुकतेच अनुरागने त्याची गर्लफ्रेंड पायल साळवी हिच्यासोबत एंगेजमेंट केली आहे.
या एंगेजमेंटचे काही खास क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनुराग आणि पायलच्या एंगेजमेंटला फक्त मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी आमंत्रित केले होते. अनुरागने एंगेजमेंट करताच सेलिब्रिटींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. एक बालकलाकार म्हणून प्रसिद्धीस आलेला अनुराग आजही देवकी चित्रपटासाठी ओळखला जातो. या चित्रपटानंतर तो दे धमाल या मालिकेतही बालकलाकार म्हणून झळकला होता. पण बालकलाकार म्हणून त्याला जेवढी लोकप्रियता मिळाली होती तेवढी लोकप्रियता त्याला नायक किंवा अभिनेता म्हणून मिळालेली नाही. डॉ डॉन, वृत्ती, निवडुंग, बारायण, पोर बाजार अशा काही मोजक्या चित्रपट तसेच मालिकेतून अनुराग नायक तसेच सहाय्यक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
पण यात त्याला म्हणावे तेवढे यश मिळाले नसल्याने अनुराग दिग्दर्शन क्षेत्राकडे वळलेला पाहायला मिळतो. देवकी चित्रपटातून अनुरागला अलका कुबल, गिरीश ओक, शिल्पा तुळसकर, सुधीर जोशी, मिलिंद गवळी अशा नामवंत कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. वृत्ती या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. पण एक अभिनेता म्हणून अनुरागला फारसे यश मिळाले नाही. अनुरागला दिग्दर्शनाची आवड आहे आणि यात काहितरी करण्याची त्याची इच्छा आहे. तूर्तास अनुराग वरळीकर आणि पायल साळवी या दोघांनाही आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.