सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत लक्ष्मीआईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे. मानसिक छळ दिल्या प्रकरणी त्यांनी मालिकेच्या कलाकारांवर आरोप लावले होते याबाबत त्या आता जवळपास एक महिन्यांनी प्रतिक्रिया देत आहेत त्यात त्या म्हणतात की, २२ नोव्हेंबर २०२१ रोजी दादर स्टेशनला मी तक्रार दाखल केली होती. त्यात सुनील बर्वे, नंदिता पाटकर, किशोरी अंबिये आणि दिग्दर्शक गायकवाड यांच्यावर मी मानसिक त्रास देत असल्याचे आरोप लावले होते. त्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी मी पोलीस स्टेशनला भेट दिली, तर त्यांनी माझी स्टेटमेंट लिहून घेतली.

मात्र त्यानंतर आजपर्यंत या तक्रारीवर कुठली कारवाई झाली हे मी पाहण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तर अजूनही यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. माझ्यावर झालेल्या अत्याचारांचा आजवर पाठपुरावा करतीये. पण पुढे अजून कुठलीच ठोस भूमिका त्यांनी घेतली नाही. मी आवाज उठवला तो केवळ माझ्यासारख्या कलाकारांना त्रास होऊ नये म्हणूनच. मी जे केलं ते एक उदाहरण म्हणून मी लोकांसमोर ठेवलं, जेणेकरून कोणावरही असे अत्याचार होऊ नयेत. ज्या कलाकारांसोबत अशा घटना घडत आहेत त्यांनीही यावर बोललं पाहिजे. मला या इंडस्ट्रीतली लोकं येऊन भेटतात आपल्याला त्रास होतोय, असं मला सांगतात. पण उघडउघड ते हे बोलून दाखवू शकत नाहीत. तुम्हाला मला हेच सांगावंसं वाटतं की तुम्ही काम मिळणार नाही ह्याचा विचार करू नका, या प्रकरणावर उघडपणे बोला.

सुनील बर्वे यांनी अन्नपूर्णा विठ्ठल यांच्याबाबत म्हटले होते की, अन्नपूर्णा यांनी स्वतः मालिका सोडली होती. त्यांनी आमच्याविरोधात तक्रार दाखल करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर अन्नपूर्णा म्हणतात की, मी गेल्या २५ वर्षांपासून हिंदी इंडस्ट्रीत काम करतीये. इतक्या मोठमोठ्या ऍक्टर्स, प्रोड्युसर, डायरेक्टर सोबत मी काम केलं आहे. पण माझ्या बाबतीत असं कधीच घडलं नाही. मला जर कोणाला दोषी ठरवायचंच असतं तर मी ते मोठमोठ्या कलाकारांवर केलं असतं. तुमच्यावर मी का असे आरोप करू? मी तुमच्याकडून सहानुभूती का मिळवू ? मला ह्यातून काय फायदा होता. माझ्यासोबत जे घडलं त्यालाच मी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेत डबिंग आर्टिस्ट स्वाती भादवे हीने देखील बंटी लोखंडेच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी बंटीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
सेटवरची आणखी एक कलाकार जीचे नाव अश्विनी आहे. तिने मला मेसेज केला होता की, असा त्रास सगळ्यांनाच सहन करावा लागत आहे. माझ्यातर चारित्र्यावर गालबोट लावण्यात आलं होतं. सेटवरचं वातावरण चांगलं नाही म्हणून मी हे काम सोडलं असं मत अश्विनीने मेसेज करून मांडलं. त्यानंतर अन्नपूर्णा यांनी सांगितलं की अनेकांनी मला पाठिंबा दर्शवणारे मेसेजेस केले आहेत. ह्या प्रकरणात जे दोषी आहेत त्या सर्वांनी माझी माफी मागावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी माझी ईच्छा होती. त्यावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या होत्या, त्या प्रतिक्रिया अन्नपूर्णा यांनी पुराव्यानिशी वाचून दाखवल्या. मी माझं मत मांडले ते चुकीचं वाटतं का हे तुम्हीच सांगा असे म्हणून त्यांनी पाठिंबा दर्शवणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. आणि ह्या प्रकरणावर लोकांचं काय मत आहे ते विचारलं आहे.