रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनघा अतुल हिने नुकतेच पुण्यात स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. अनघा अतुल ही प्रसिद्ध ज्योतिषी अतुल भगरे यांची मुलगी आहे. रंग माझा वेगळा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अनघाने तिच्या हॉटेल व्यवसायात उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अनघाच्या या हॉटेलचा शुभारंभ नुकताच पार पडलेला पाहायला मिळाला. वदनी कवळ या नावाने अनघाने पुण्यात हॉटेल सुरू केले आहे. पुण्यातील डेक्कन बस स्टॉप समोर डेक्कन हाईट्स आहे, त्याच्या पहिल्या मजल्यावर तिने हा हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे.
शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन डायनिंग हॉल असलेल्या वदनी कवळमध्ये शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी खवय्यांनी गर्दी केली होती. काल गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी ललित पंचमीच्या मुहूर्तावर तिच्या या हॉटेलचा शुभारंभ पार पडला. यावेळी मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. आशुतोष गोखले, अनुष्का पिंपूटकर, मैत्रेयी दाते, अपूर्व रंजनकर, ऋतुजा बागवे या सेलिब्रिटींनी वदनी कवळमधील जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत अनघाने त्यांना स्वतःच्या हाताने वाढून आग्रहाने खाऊ घातले. अनघा आणि तिचा भाऊ अखिलेश भगरे या दोघांनी मिळून वदनी कवळचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. मराठी सेलिब्रिटी अभिनयाच्या जोडीला व्यवसाय क्षेत्रात गुंतवणूक करत असतात.
आपलंही असं एक हॉटेल असावं जिथे शुद्ध शाकाहारी जेवणाचा खवय्यांना मनमुराद आनंद लुटता येईल. पुण्यात शुद्ध शाकाहारी थाळीचे अनेक हॉटेल्स आहेत. पण या स्पर्धेत आपले नावीन्य आणि ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी अनघाला थोडासा संघर्ष करावा लागणार आहे. अर्थात तुमच्या जेवणाची चव उत्तम असेल आणि आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य केले तर तुम्ही या स्पर्धेत टिकू शकता. अनघाने या गोष्टीचा नक्कीच विचार केलेला आहे त्यामुळेच तिने या व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवले आहे. त्यामुळे निश्चितच वदनी कवळला पुणेकर छान प्रतिसाद देतील असा विश्वास वाटतो.