स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. मालिकेच्या ओपनिंगलाचा प्रेक्षकांनी खूप मोठा प्रतिसाद दिल्याने मालिकेने इतिहास घडवला होता. त्याचवेळी ही मालिका काहीतरी कमाल घडवून आणणार याची शाश्वती मिळाली होती. मालिकेतील अर्जुन आणि सायलीचे पात्र प्रेक्षकांना तर आवडलेच, मात्र इतर पात्रांचाही प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर पडला आहे. सायली लवकरच अर्जुनचेही मन जिंकून घेईल आणि तिची तन्वी ही ओळख सर्वांसमोर येईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
तूर्तास ही ओळख होईल तेव्हा होईल, पण आता मालिकेतील अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील सायलीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. ठरलं तर मग मालिकेत अर्जुनची भूमिका अमित भानुशाली याने साकारली आहे. अमित अमराठी असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून तो मराठी सृष्टीशी जोडला गेलेला आहे. दिसायला देखणा आणि पिळदार शरीरयष्टीमुळे अमित प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतो आहे. फिटनेसची आवड असलेल्या अमितला घरी पाहुणे जरी आले तरी जिममध्ये जायचे मुळीच टाळत नाही. याचमुळे त्याला मराठी मालिकेचा नायक बनण्याची नामी संधी मिळाली आहे. अमित हा मूळचा गुजराथचा, मात्र मुंबईतच त्याचे शिक्षण झाले. आठ वर्षांपूर्वी मराठमोळ्या श्रध्दाशी त्याचे लग्न झाले तेव्हा त्याच्या घरी मराठी आणि गुजराती संस्कृतीची सांगड घातली गेली.
श्रद्धा जेव्हा अमितच्या घरी दाखल झाली तेव्हा गुढी पाडवा हा पहिला सण तिने साजरा केला होता. तुला जे आवडेल ते तू कर अशी सासूनेच तिला मोकळीक दिली होती. त्यामुळे श्रद्धाला भानुशाली कुटुंबात आल्यावर मुळीच दडपण आले नव्हते. आपल्या करिअरच्या सुरुवातीला अमित मराठी मालिकांमधून काम करत होता. मन उधाण वाऱ्याचे, सासूबाई गेल्या चोरीला, घेतला वसा टाकू नको, स्वराज्यरक्षक संभाजी, धर्म योद्धा गरुड अशा हिंदी मराठी मालिका तसेच गुजराती चित्रपटात झळकण्याची संधी त्याला मिळत गेली. मुख्य सहाय्यक भूमिका ते मराठी मालिकेचा नायक असा अमितचा प्रवास खूपच उल्लेखनीय कामगिरी करणारा ठरला आहे. आयुष्यात अनेक चांगले वाईट प्रसंग आले, मात्र या प्रवासात श्रद्धाची त्याला खंबीर साथ मिळाली.
आपल्या कठीण काळात श्रद्धाने मला खूप सपोर्ट केला असे अमित म्हणतो. अमित रियल लाईफमध्ये खूप बोलका आहे, मात्र मालिकेत त्याने साकारलेला अर्जुन खूपच शांत आणि गंभीर आहे. त्यामुळे ही भूमिका निभावण्यासाठी त्याला खास कष्ट घ्यावे लागतात. त्याने साकारलेला अर्जुन सायलीला कधी आपलेसे करेल याचीच प्रेक्षक वाट पाहत आहेत. या भूमिकेसाठी अमित भानुशाली याचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.