रमेश देव आणि सीमा देव यांचा मुलगा म्हणून अजिंक्य देव यांच्याकडे पाहिलं जातं. दोघांचं एवढं मोठं नाव असतानाही अजिंक्यला मात्र नायक म्हणून या इंडस्ट्रीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. खरं तर अमेरिकेत जाऊन नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण वडिलांच्या इच्छेखातर तो सिने इंडस्ट्रीत दाखल झाला. या प्रवासाबद्दल अजिंक्य देव यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अफवांबद्दलही एक खुलासा केला आहे. ते म्हणतात की, कॉलेज संपल्यानंतर अमेरिकेत नोकरीसाठी मी एप्लिकेशन दिलं होतं.
काका राजदत्त यांनी मला त्यांच्या चित्रपटासाठी विचारलं होतं. अर्धांगी हा माझा पहिला चित्रपट. मी अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली तो काळ एकतर विनोदी चित्रपटांचा असायचा नाहीतर बायकांचा असायचा. त्यामुळे माझी थोडीशी ओळख बाजूला पडली. प्रेक्षकांचा देखील कल अशा चित्रपटांकडे जास्त असायचा. माहेरची साडी चित्रपटाने त्याचा एक वेगळा ट्रॅक सुरू केला. हा चित्रपट प्रचंड गाजला. अल्काला या चित्रपटाचा खूप फायदा झाला कारण त्यानंतर तिने तसेच चित्रपट केले. पण माझ्या बाबतीत थोडं वेगळं झालं. माझी पर्सनॅलिटी साधारण कुटुंबातील व्यक्तीला शोभत नव्हती आणि अत्याचार करणारा व्यक्ती म्हणूनही मी वाटत नसल्याने मला चित्रपट मिळत नव्हते.
आताच्या घडीला मी कुठेतरी भूमिकेसाठी परफेक्ट वाटू लागलो, तसे मी एवढ्या कमी दिवसात पाच चित्रपट केले आहेत. अजिंक्य देव पुढे असेही म्हणतात की मला चित्रपट जास्त मिळत नसायचे. लोकांना वाटायचं की मी एवढ्या मोठ्या घरातला मुलगा मग हा आपल्या बजेटमध्ये बसणार नाही. तर काही लोकांचे कान भरले गेले की हा खूपच उद्धट आहे. तो फारच मस्तीवाला आहे जे की हे सगळं खोटं होतं. त्यामुळे बऱ्यापैकी माझ्याकडे चित्रपट आले त्यातले काही चालले काही ते लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यामुळे अनेकदा माझ्याबाबत असं म्हटलं गेलं की मी मधल्या काळात कुठेच दिसलो नाही. मी वर्षात एक चित्रपट केलेला असायचा पण मधले काहीच दिवस माझ्याकडे काम नसायचं.
हिंदी, मराठी, इंग्रजी भाषिक मी १४० चित्रपट केलेत त्यामुळे मी या इंडस्ट्रीत बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आईवडील दोघेही इंडस्ट्रीतील मोठं नाव त्यामुळे अनेकदा मला डावलण्यात आलं, कित्येकांनी मला मुद्दामहून बाजूला करण्याचा प्रयत्नही केला. त्यांच्या नावामुळे माझ्यासाठी या इंडस्ट्रीत दारं उघडी होती पण ते तेवढया पुरतेच. पुढचा स्ट्रगल मलाच करावा लागायचा. घोड्याला स्वतःच पाणी प्यायला जावं लागतं पण माझा लगाम दुसऱ्यांच्या हाती होता. हे वलय कदाचीत पाठीशी नसतं तर मी वेगाने पुढे गेलो असतो असं मला वाटतं. अशी एक खंत अजिंक्य देव यांनी या मुलाखतीत बोलून दाखवली.