अभिनय क्षेत्रात मुरलेले कलाकार पुढे जाऊन निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्राकडे वळतात. मराठी सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रातून आपले नशीब आजमावताना दिसतात. तेजश्री प्रधान, तेजस्विनी पंडित, रितेश देशमुख, संकर्षण कऱ्हाडे अशी बरीचशी उदाहरणं तुम्हाला या सृष्टीत पाहायला मिळतील. ज्यांनी नुकतेच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे याने मराठी चित्रपटातून बालकलाकार ते प्रमुख नायक अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत. मराठी सृष्टीत स्थिरस्थावर होताना त्याने नुकतेच दिग्दर्शन क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले आहे.
वडील महेश कोठारे यांच्या सोबत आदिनाथ सहदिग्दर्शकाची कामं करताना नेहमी दिसला आहे. मात्र आता तो प्रथमच जाहिरात क्षेत्रात देखील दिग्दर्शक बनून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आदिनाथची मुख्य भूमिका असलेली विक्रम टी म्हणजेच विक्रम चहाची जाहिरात सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बाप्पाची मूर्ती घडवत असताना एका मूर्तिकाराच्या भावना कशा असतील? बाप्पाशी तो गप्पा कशा मारत असेल. याचे उदाहरण या जाहिरातून दिल्याने ही जाहिरात सध्या तुफान गाजलेली पाहायला मिळत आहे. विक्रम चहाच्या या जाहिरातीचे दिग्दर्शन स्वतः आदिनाथने केले आहे. महत्वाचं म्हणजे यात तो प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे.
बाप्पा तुम्हाला जर कधी कंटाळा येईल ना तेव्हा परश्याच्या हातचा एक कडक चहा नक्की प्या. असे आवर्जून सांगणारा मूर्तिकार प्रेक्षकांनाही खूपच भावला आहे. आदिनाथच्या अभिनयाचं आणि त्याच्या दिग्दर्शनाचं मराठी सेलिब्रिटींनी खूप कौतुक केलं आहे. ही जाहिरात पाहून अभिनया सोबतच उत्तम दिग्दर्शन सुध्दा करू शकतो असा विश्वास चाहत्यांना वाटत आहे. वेड या मराठी चित्रपटातून रितेश देशमुखने देखील दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या चित्रपटात अशोक सराफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर रितेशची पत्नी या जिनीलिया देशमुख या चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शीत होईल असे सांगितले जाते.