आपल्या स्वप्नातलं पहिलं वहिलं घर आणि गाडी खरेदी या गोष्टी प्रत्येकाच्याच आयुष्यात अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या ठरत असतात. मग तो सामान्य व्यक्ती असेल किंवा एखादा कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा आठवणी शेअर करताना प्रत्येकासाठी हा क्षण सुखावणारा ठरतो. असाच काहीसा अनुभव कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेच्या नायिकेने घेतलेला आहे. मालिकेची नायिका म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतःची पहिली वहिली कार खरेदी केली आहे. ‘माझी तीन चाकी मला चार चाकीपर्यंत घेऊन आली’ असे कॅप्शन देऊन तिने ही बातमी शेअर केली आहे.

ह्युंदाईची आय ट्वेन्टी ही कार खरेदी करताना योगीताने हा आनंदाचा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या गाडीची किंमत साधारण ११ लाख इतकी आहे. अर्थात ही एक किंमत जरी असली तरी त्या किमतीहून स्वतःच्या हिमतीवर आयुष्यातली पहिली कार खरेदी करणं हे योगितासाठी कितीतरी अधिक पट सुख देणारं ठरलं आहे. योगिता चव्हाण ही मराठी टेलिव्हिजन मालिका अभिनेत्री आहे. श्रावण क्वीनची मानकरी ठरलेल्या योगिताला अभिनयाची संधी मिळाली ती सोशल मीडियाच्या माध्यमातून. योगिताने अभिनय क्षेत्रात येण्याआधी मॉडेलिंग क्षेत्रात नाव मिळवलं होतं. २०१६ मध्ये तिने श्रावण क्वीनचे उपविजेतेपद पटकावले होते. यातूनच पुढे तिला गावठी या चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली होती.

जाडू बाई जोरात, बापमाणुस, नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या मराठी मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर ‘भाकरवाडी’ सारख्या हिंदी मालिकेत देखील तिने काम केले. जीव माझा गुंतला या मालिकेतील अंतराच्या भूमिकेने योगीताला चांगली प्रसिद्धी मिळाली. या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत, कधी धाडसी तर कधी प्रेमळ दिसणारी अंतरा याच कारणामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. अंतरा आणि मल्हारची नोकझोक मालिकेतून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. म्हणूनच रिक्षा चालवून आपले शिक्षण करणारी अंतरा प्रेक्षकांच्या मनात उतरली. मी एका सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे माझ्या आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मी या क्षेत्रात येऊ शकले. मालिकेतून लोकप्रियता मिळवू शकले असे ती नेहमी म्हणते.
मालिकेतून स्थिरस्थावर होताना आता स्वतःची गाडी खरेदी करावी असे योगीताला वाटले. आपलीही स्वतःची गाडी असावी हे स्वप्न तर प्रत्येकजण पाहत असतो, पण ते सत्यात उतरवण्यासाठी तेवढीच मेहनत देखील घ्यावी लागते. अंतराच्या भूमिकेसाठी देखील योगीताने मेहनत घेतली होती त्यामुळेच मी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवू शकले असे ती म्हणते. मालिकेतील अंतरा आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांना आवडली असल्यानेच एक वर्षाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. आयुष्यातील पहिल्या वहिल्या कार खरेदीवरून योगीतावर सेलिब्रिटींनी देखील अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ‘माझी तीन चाकी मला चार चाकी पर्यंत घेऊन आली’ या तिच्या कॅप्शनमधूनच ती खूप काही सांगताना दिसते.