काल ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. परंतु एका मराठी अभिनेत्रीसाठी हा दिवस एका वेगळ्या अर्थाने खूपच खास ठरलेला पाहायला मिळाला. कारण लंडन येथील रॉयल अल्बर्ट हॉल येथे या अभिनेत्रीने रॉयल कॉलेज ऑफ आर्टस् विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली त्याचा समारंभ काल जागतिक महिला दिनाच्या दिवशी पार पडल्याने तिचा हा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ही अभिनेत्री आहे सखी गोखले. गेल्या काही वर्षांपासून सखी गोखले तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच अभिनेता सुव्रत जोशी सोबत लंडन येथे स्थायिक झाली आहे. आपल्या पुढील शिक्षणासाठी सखीने अमर फोटो स्टुडिओ हे नाटक सोडले होते.
नुकतेच Curating Contemporary Art या विषयातून सखीने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मराठी लेखिका, प्रसिद्ध वृत्तपत्रच्या स्तंभलेखिका, कवयित्री आणि संतसाहित्याच्या अभ्यासक विजया व्यंकटेश संगवई या सखी गोखले च्या आज्जी आहेत. तर व्यंकटेश संगवई हे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. सखीची आई म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखले या देखील उच्चशिक्षित आहेत. शुभांगी संगवई गोखले यांनी मानसशास्त्र विषयातून पदवी मिळवल्यानंतर नाट्यशास्त्राचे धडे गिरवले होते. त्यामुळे माझ्या घरात मी एकटीच हा आनंद साजरा करणारी नाही हे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. लहानाची मोठी होत असताना माझ्या आजूबाजूला अशा अनेक विलक्षण कर्तृत्ववान महिलांना मी पाहिलं आहे. ह्याच कारणामुळे मी माझी स्वप्न पूर्ण होताना पाहत आहे.
या सर्वाचे श्रेय सखीने तिची आई शुभांगी गोखले आणि नवरा सुव्रत जोशी यालाही दिले आहे. तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी हे करू शकले असे ती आवर्जून सांगताना दिसते. सखीने या संदर्भात सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. त्यात तिने ह्या सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत. सखीने जाहिरात क्षेत्रापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. रंगरेझ या हिंदी चित्रपटातून तिला अभिनयाची संधी मिळाली होती. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखी गोखले जे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. दिल दोस्ती दोबारा, अमर फोटो स्टुडिओ, पिंपळ अशा मालिका, चित्रपट आणि नाटकातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. फोटोग्राफीची आवड असलेल्या सखीने काही वृत्त पत्रांसाठी लेख देखील लिहिले आहेत.