झी मराठी वाहिनीवरील यशोदा गोष्ट श्यामच्या आईची ही नवी मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. मालिकेत छोट्या बयोची लगीनघाई सुरू आहे. आता तिचा धीटपणा साने कुटुंबियांना भुरळ घालणारा ठरला आहे, मात्र आजीचा तिच्यावर चांगलाच राग आहे. या आज्जी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी ही भूमिका सुरेख साकारलेली पाहायला मिळत आहे. नयना आपटे बऱ्याच प्रतिक्षेनंतर आता मालिका सृष्टीकडे वळल्या आहेत. हे मन बावरे, चूक भूल द्यावी घ्यावी अशा मालिका आणि संगीत नाटक त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत.
आज २२ फेब्रुवारी रोजी नयना आपटे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या बद्दलच्या काही अपरिचित खास गोष्टी जाणून घेऊयात. नयना आपटे यांच्या आई शांता आपटे या मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री, संगीतकार होत्या. बंडखोर नायिका अशीही त्यांची ओळख होती. शांता आपटे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी १९३० सालच्या श्यामसुंदर चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. प्रभात फिल्म कंपनीच्या अमृतमंथन, अमरज्योति, कुंकू चित्रपटात नायिका म्हणून झळकल्या होत्या. त्यावेळी चित्रपटात काम करण्यासाठी कलाकारांना करारबद्ध केले जायचे. मात्र माणूस या चित्रपटासाठी प्रभात फिल्म कंपनीने बाहेरून नटी मागवल्याने शांता आपटे यांनी बंड पुकारला होता. आपले मानधन वाढवून द्या, नाहीतर करारातून सुटका करा अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती.
शांता आपटे त्यानंतर दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटाकडे वळल्या. सावित्री हा त्यांनी अभिनित केलेला तमिळ चित्रपट खूपच गाजला होता. शांता आपटे उत्तम गायिका होत्या अनेक चित्रपटातून त्यांनी गाणी गायली होती. आभिनयाच्या जोडीला त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले सोबतच काही चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. मंदिर, मै अबला नहीं हूँ, वाल्मिकी अशा चित्रपटातून त्यांनी दमदार अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. चित्रपटात जशा दमदार भूमिका होत्या खऱ्या आयुष्यात सुद्धा त्या निर्भीड राहिल्या. आपली मासिकातून बदनामी केल्या प्रकरणी त्यांनी फिल्म इंडियाच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला होता. अशाच शिस्तीच्या वातावरणात नयना आपटे यांचे बालपण गेले. वयाच्या ४ थ्या वर्षांपासूनच नयना आपटे नाटकातून काम करत असत, सोबतच त्यांनी गायनाचे देखील धडे गिरवले होते.
२४ फेब्रुवारी १९६४ रोजी शांता आपटे यांचे कॅन्सरच्या गंभीर आजाराने निधन झाले. त्यावेळी नयना आपटे अवघ्या १४ वर्षांच्या होत्या. आपल्या आईला त्यांनीच अग्नी दिला होता. शांता आपटे यांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेला सील लावण्यात आले. कारण वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत त्यांच्या नावावर ही मालमत्ता होणार नव्हती. त्यामुळे राहता बंगला आणि मालमत्ता असूनही नाईलाजास्तव त्यांना हक्काचं घर सोडावं लागलं होतं. त्यावेळी त्या पुण्याला राहायला गेल्या. अशा परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत नयना यांनी ८४ टक्के गुण मिळवले होते. शिक्षणानंतर पुन्हा त्या नाटक, चित्रपटात काम करू लागल्या. या प्रवासात त्यांना राजा गोसावी, चित्तरंजन कोल्हटकर, दामू केंकरे यांसारखी दिग्गज मंडळी भेटली. संगीत नायक, मालिका, चित्रपट असा त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरू आहे.