नायक, नायिका यांच्या जोडीला खलनायकाची भूमिका वठविणारे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या आजही स्मृतीत आहेत. ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या काळात नायकेच्या भूमिकेला विरोध दर्शवणारी खाष्ट आणि कजाग सासू रंगवणाऱ्या इंदिरा चिटणीस यांच्याबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात. चित्रपटातील बरेचसे चेहरे आजही आपल्या डोळ्यासमोर आहेत. मात्र त्यांची नावं काय आहेत हे बहुतेकांना माहीत नसते. इंदिरा चिटणीस याही त्यातल्याच एक. त्यांनी आपल्या अभिनयाने खाष्ट सासूच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडले होते. इंदिरा यांच्या अभिनयाची सुरुवात झाली ती रंगभूमीवरून. १९१२ सालचा त्यांचा जन्म, जेमतेम चौथी इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते.
अभिनयाची आवड असल्याने त्या आरशासमोर उभे राहून हावभाव करायच्या. रोज रामरक्षा म्हणत असल्याने त्यांचे शब्दोच्चार अतिशय स्पष्ट होते. वडिलांच्या मदतीने त्यांनी नाट्य निर्माते दिग्दर्शक मो ग रांगणेकरांची भेट घेतली आणि नाटकात काम करण्याची ईच्छा व्यक्त केली. दिसायला अतिशय साधारण असलेल्या इंदिराकडे पाहून हिला कोणती भूमिका द्यावी असा प्रश्न रांगणेकरांना पडला. पण तरीही त्यांनी नाटकातून इंदिराला छोट्या मोठ्या भूमिका देऊ केल्या. नाटकातून काम करत असतानाच १९३९ रोजी दामोदर तुकाराम अधटराव यांच्याशी त्यांनी विवाह केला. दरम्यान चित्रपटात काम करायचे असेल तर सासरचे आडनाव लावायचे नाही. अशी तंबीच त्यांच्या सासूबाईंनी दिली असल्याने पुढेही त्या आपल्या नावापुढे चिटणीस लावत होत्या.
उत्कृष्ट संवाद फेक आणि स्पष्ट उच्चार यांमुळे इंदिरा चिटणीस यांना भालजी पेंढारकर यांनी १९४१ सालच्या थोरातांची कमळा चित्रपटात भूमिका देऊ केली. हा त्यांनी अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. मोहित्यांची मंजुळा, चिमणी पाखरं, मल्हारी मार्तंड, भाग्यलक्ष्मी, सवाल माझा ऐका, बायकोचा भाऊ अशा जवळपास १०० हुन अधिक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. सूर्यकांत, चंद्रकांत, राजा परांजपे, जयश्री गडकरी, सुलोचना लाटकर यांच्या तोडीसतोड अभिनयाने इंदिरा यांनी आपल्या भूमिकांची दाखल घ्यायला भाग पाडले होते. त्यांनी खाष्ट सासू जेवढी रंगवली तेवढ्याच त्या विनोदी भूमिकेत देखील चपखल बसल्या होत्या. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त सर्व कलाकारांनी त्यांच्यावर लिहिलेले लेख समर्पिता या पुस्तकरूपाने प्रकाशीत करण्यात आले होते.