कारे दुरावा, आई कुठे काय करते ,एका लग्नाची दुसरी गोष्ट या आणि अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांधून सोज्वळ आणि सालस भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. ईला भाटे यांचे संपूर्ण जीवन विले पार्ले येथे गेले. बालपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या ईला भाटे यांनी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग दर्शवला होता. अगदी बालनाट्य, हौशी नाटकही त्यांनी साकारले होते. ईला भाटे यांना चित्रकलेची भयंकर भीती होती. शाळेत दुसऱ्या दिवशी चित्रकलेचा विषय असेल त्यावेळी त्या विचारानेच त्यांना रडू यायचे.
ही भीती घालवण्यासाठी त्यांच्या आईने त्यांना चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. तेव्हापासून या विषयाची भीती त्यांच्यातून कमी झाली होती. मात्र मोठं होऊन सर्जन बनायचं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. दहावीच्या परीक्षेत त्या बोर्डात देखील आल्या होत्या. परंतु बारावी इयत्तेत त्यांना केमिस्ट्री विषयात खूप कमी गुण मिळाले. त्यामुळे डॉक्टर बनायचं त्यांचं स्वप्न अधुरच राहिलं. काही दिवस त्या खूप नैराश्यात गेल्या. दरम्यान उदय भाटे यांच्याशी त्यांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम जुळून आले. उदय भाटे डॉक्टर असल्याने त्यांच्या व्यवसायाच्या निगडीत व्यवसाय करायचे ईला भाटे यांनी ठरवले. डिएमएलटीचा कोर्स करून त्यांनी स्वतःची लॅब सुरू केली.
हा व्यवसाय एक काम म्हणून त्यांनी पाहिला होता, मात्र यात त्यांचे फारसे मन रमेना. ईला भाटे यांच्या नवऱ्यानेच शेवटी त्यांना आवडत्या क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला. मग अभिनय हे आवडते क्षेत्र असल्याने त्यांनी त्या दिशेने पाऊले टाकली. १९८६ साली त्यांनी व्यावसायिक नाटकातून पदार्पण केले. मग मालिका, चित्रपट, नाटक असा त्यांचा प्रवास सुरळीत सुरू झाला. गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून ईला भाटे यांनी मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. चेहऱ्यावर कुठलेही आढेवेढे न घेता त्यांनी सोज्वळ अभिनेत्रीच्या भूमिका निभावल्या. ईला भाटे यांची मुलगी ऋचा भाटे ही देखील शालेय शिक्षणात अतिशय हुशार मुलगी.
दहावी इयत्तेत असताना तिने बोर्डात नंबर मिळवला होता. तर बारावी कला शाखेतून तिने प्रथम येण्याचा मान पटकावला. पुढे २००४ साली इकॉनॉमिक्स विषयातून एम ए केल्यानंतर ऋचाने सर्वाधिक गुण मिळवून गोल्ड मेडल पटकावले. हे मेडल तिला डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते देण्यात आले होते. पुढे जर्मनीत जाऊन जर्मन भाषेचे ज्ञान तिने अवगत केले. जर्मनीतील मुलांमध्ये ऋचाने पहिला क्रमांक पटकावला होता. परदेशी विद्यापीठात मुलांना शिकवण्याचे काम तिने केले आहे.