नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाला अवघ्या दोन दिवसातच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला आहे. झुंड हा चित्रपट विजय बारसे या क्रीडा प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. झोपडपट्टी तसेच फुटपाथवरील गुन्हेगारी, चोरी, गांजा विक्री करणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या मुलांना त्यांची मनं वळवून फुटबॉल खेळाकडे आकर्षित केले. नेमकी हीच कथा प्रेक्षकांना झुंड चित्रपटातून पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे तर आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, सोमनाथ अवघडे हे कलाकार या चित्रपटात झळकले आहेत.
चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना आवडले असून अनेकांनी नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे. अगदी मराठी सृष्टीतील कलाकारांनी देखील चित्रपटाबद्दल भरभरून बोलले आहे. पण याबाबत बोलल्यामुळे आपल्याला टीकेला सामोरे जावे लागणार हे ओळखून असलेल्या हेमांगीने मात्र त्या अनुषंगाने एक पोस्ट लिहिली आहे. यात ती म्हणते की, तुम्हांला एखादा सिनेमा आवडला आणि त्याबद्दल सोशल मीडियावर लिहिण्याची हल्ली चोरीच झालीये जणू! तुम्हांला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. हिंदीबद्दल शेअर केलं तर मराठीबद्दल का नाही केलं? मराठी केलं तर ‘त्यांचं’ च केलंस ‘आमचं’ का नाही! म्हणजे सगळं येऊन शेवटी ‘तिथंच’ अडतंय! किती काळ आणि वर्ष जाणार आहेत अजून त्यांचं आमचं मिटवायला?
मधले लोक जे हे काही मानत नाहीत त्यांची किती गोची झालीये की या मधल्या लोकांमुळेच जग अजून ही स्थिर स्थावर आहे? जगा आणि जगू द्या तसंच सिनेमा बद्दल सांगा आणि सांगू द्या! कलाकारांनी कुठल्याही चित्रपटाबद्दल मत व्यक्त केल्यावर त्यांच्या मताचा वेगळा अर्थ लावण्यात येतो. काही वेळापूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील एक पोस्ट लिहिली होती. जात जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. झुंड सिनेमा म्हणून पाहा असे परखडपणे मत केदार शिंदे यांनी मांडलेले पाहायला मिळाले. त्यामुळे आता चित्रपट हा एक मनोरंजनाचा भाग म्हणून पाहिला जावा अशीच भावना अनेकांच्या मनात दडलेली पाहायला मिळत आहे.