२००१ साली श्वेता शिंदे आणि प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला आभास हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुभाष फडके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात अनिता कुलकर्णी, प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, अंजली आमडेकर, वृषाली मते यांनीही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील क्षमाची भूमिका अनिता कुलकर्णी यांनी साकारली होती. आज अनिता कुलकर्णी हे नाव हिंदी सृष्टीला चांगलंच ओळखीचं झालं आहे. कारण एवढ्या वर्षात अनिता यांनी हिंदी मालिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. अनिता कुलकर्णी बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
अनिता कुलकर्णी यांचे शिक्षण मुंबईतच झाले. दहावी इयत्तेत शिकत असताना मैत्रिणीच्या सांगण्यावरून त्यांनी नाटकात काम केले होते. राज्य नाट्य स्पर्धांमधून अनिता यांनी उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकं पटकावली होती. याच दरम्यान त्यांनी वामन केंद्रे यांच्याहाताखाली काम केले. पुढे एका मराठी मालिकेत अनिता यांना छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्याच दरम्यान बी आर चोप्रा यांच्या कानून मलिकेसाठी त्यांनी ऑडिशन दिली. फारसा अनुभव नसतानाही बी आर चोप्रा यांनी अनिताला आपल्या मालिकेत अभिनयाची संधी दिली. १९९३ साली दूरदर्शनवरील कानून मालिकेने अनिता कुलकर्णी यांना मोठी लोकप्रियता मिळाली. अनिता यांनी त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. हिंदी मालिका सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा चांगलाच जम बसवला.
याचदरम्यान काही मोजक्या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. हिंदी मालिका सृष्टीत नावारूपाला आल्याने त्यांनी इथेच आपले बस्तान बांधले. बालिका वधू, तहकीकात, दिवार, ओम नमः शिवाय, एक आस्था ऐसी भी, पालमपूर एक्सप्रेस, अगर तुम ना होते, तेरी मेरी डोरीयां अशा मालिकांमधून त्यांनी अनेक महत्वपुर्ण भूमिका साकारून हिंदी मालिका सृष्टीत नाव कमावले. आज हिंदी सृष्टीत अनेक मराठी चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातीलच एक म्हणजे अनिता यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. अनिता कुलकर्णी मुंबईतच वास्तव्यास आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या घराची जबाबदारी सांभाळली होती. अनिता यांना विस्तार हा एकुलता एक मुलगा आहे. विस्तारला तबला वादनाची आवड आहे. सिंगल मदर म्हणून त्या आपल्या मुलाचे पालनपोषण आणि आईची जबाबदारी त्या व्यवस्थित सांभाळत आहेत.