अभिनयाने प्रेक्षकांना रडवण सोपं असतं पण विनोदी अभिनयाने हसवणं तेवढंच कठीण काम आहे. मराठी सृष्टीत खूप कमी अभिनेत्री आहेत ज्यांनी विनोदी अभिनेत्रीचा ठसा उमटवला आहे. यामध्ये आरती सोळंकी हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. आरती सोळंकी तिच्या विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. गेले काही वर्षे ती या क्षेत्रापासून थोडीशी बाजूला झालेली पहायला मिळाली होती. पण स्वतःमध्ये बदल करत आरतीने आता पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलेलं आहे.
नुकतीच आरतीने ढोलकीच्या तालावर रिऍलिटी शोच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी आरतीने तब्बल ५० किलो वजन घटवलेले पाहायला मिळाले. तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांनी तिचं मोठं कौतुक केलं आहे. २०२१ साली आरतीने वजन घटवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा तिचं १३२ किलो वजन होतं. साधारण ११९ किलो वजन झाल्यानंतर या कामात व्यत्यय आला. पण त्यानंतर आरतीने पुन्हा एकदा वजन घटवण्याचा ठाम निर्णय घेतला. दिवसातले आठ आठ तास ती फक्त चालतच होती. या आठ तासात ती चाळीस हजार पाऊलं चालतच होती. त्यामुळे आरतीचे पाय प्रचंड दुखत असत. यामुळे रात्री झोपताना ती रडतच झोपी जायची. दरम्यान तिने खाण्यातही मोठा बदल केला.
भूक लागलीच तर सँडविच किंवा भेळ खाऊन ती तिचे डाएट सांभाळत होती. या अशा रुटीनमुळे तिने अवघ्या काही महिन्यातच तब्बल ५० किलो वजन घटवले होते. आता आरतीचे वजन ८४ किलो आहे पण तिला अजूनही तिचे वजन घटवण्याची इच्छा आहे. साधारण ७० पर्यंत तिला हे वजन आणायचं आहे. वजन कमी झाल्यामुळे आरतीमध्ये पॉजिटीव्हीटी आली आहे. लोकं खूप कौतुक करत आहेत. मला माझी पर्सनॅलिटी बदलून टाकायची आहे. कारण याअगोदर मी खूप नकार पचवले आहेत, लोकांचं खूप काही ऐकून घेतलं आहे. रोज आठ तास चालल्यामुळे माझे पाय खूप दुखतात, पण आज रडेन उद्या रडेन पण कधीतरी हसेन स्वतःला पाहून. असे म्हणत आरतीने स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणला आहे.