दिवाळी म्हटलं की फटाक्यांना विरोध होणार हे एक ठरलेलं समीकरण पाहायला मिळतं. अर्थात फटाक्यांमुळे प्रदूषणात भर पडते हे जरी खरे असले तरी इतर सणांच्या बाबतीत अशा गोष्टी का वर येत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जातो. प्रियांका चोप्रा हिनेही दिवाळीच्या फटाक्यांमुळे प्रदूषण होते, दमा वाढतो असे एक आक्षेपार्ह विधान केले होते. पण त्याच दम्याचा त्रास असलेली प्रियांका चोप्रा जेव्हा सिगारेट ओढते तेव्हा हे ज्ञान कुठे जाते असा प्रश्न तिला विचारण्यात येतो. आजही तिच्या या विधानामुळे प्रियंकाला ट्रोल करण्यात येते.
असाच काहीसा मुद्दा अभिनेते वैभव मांगले यांनीही उपस्थित केला आहे. त्यामुळे वैभव मांगले सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेले आहेत. वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केलेली पाहायला मिळाली. ज्यात त्यांनी म्हटले होते की, कळकळीची विनंती मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश महानगरातील हवा कमालीची प्रदूषित आहे. कृपया फटाके फोडून ती अधिक प्रदूषित करू नका. असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. पण त्यानंतर टीकाकारांनी वैभव मांगले यांचा खरपूस शब्दांत समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. वैभव मांगले यांनी त्यांचे मत सोशल मीडियावर मांडले खरे पण यामुळे टीकाकारांनी त्यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे.
चार दिवस जिथे प्रदूषण कमी असेल अशा ठिकाणी वैभव मांगले यांनी त्यांचा मुक्काम हलवावा अशीही त्यांना विनंती केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. वैभव मांगले सध्या मर्डरवाले कुलकर्णी या नाटकातून प्रमुख भूमिका साकारत आहेत. अभिनयाच्या जोडीला त्यांना गाण्याची तसेच चित्रकलेची विशेष आवड आहे. लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या दगडांवर त्यांनी सुंदर चित्र रंगवली होती. त्यांच्या या कलेने अनेकांना त्यांनी आश्चर्यचकित केले होते. सोशल मीडियावर सक्रिय असलेले वैभव मांगले त्यांच्या परखड मतांमुळेही कायम चर्चेत राहिले आहेत. पण कालच्या त्या पोस्टमुळे वैभव मांगले प्रचंड प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहेत.