अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेत सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली. यामागचा मुख्य उद्देश हाच होता की पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि सर्वांना मोकळा श्वास घेता यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ते गावोगावी देवराई उभारली जावी आणि लोकांकडून वृक्षारोपण केले जावे या प्रयत्नात आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या मदतीने त्यांनी बीड जिल्ह्यात सह्याद्री देवराई हा प्रकल्प उभारला होता. बीड शहराजवळ पालवण येथील वनविभागाच्या दोनशे हेक्टर परिसरात मागील काही वर्षांपासून सह्याद्री देवराई हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून या ठिकाणी काम सुरू केले होते.
विविध जातीच्या पावणे दोन लाख वृक्षांची या ठिकाणी लागवड करण्यात आली होती. या परिसरातले काम पूर्णत्वास येत असलेले अनेक फोटो सयाजी शिंदे यांच्या सोशल अकाउंटवर शेअर करताना दिसायचे. मात्र दुर्दैवाने ह्या देवराई प्रकल्पाला आग लागून बरेचसे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. ह्या बातमीने अनेक वृक्षप्रेमींनी, निसर्गप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. देवराईत लागलेल्या आगीचे कारण आद्यप स्पष्ट झाले नसले तरी, या देवराई प्रकल्पात लावलेल्या झाडांना आगीने भक्ष्य करून पुरती राखरांगोळी केलेली दिसत आहे. बीडची देवराई पर्यटकांचे आकर्षण ठरत होते. इथल्या परिसराला अनेकजण भेट द्यायला यायचे. मात्र आता हे कटकारस्थान कोणी केले असावे हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ह्या प्रकरणाबाबत तातडीने योग्य ती चौकशी केली जावी अशी मागणी आता केली जात आहे. अरविंद जगताप यांनी देखील हळहळ व्यक्त करत प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच सयाजी शिंदे झी मराठीवरील हे तर काहीच नाय या मंचावर आले होते. त्यावेळी ते या देवराई प्रकल्पाबाबत भरभरून बोलले होते. नुकताच घडलेला प्रसंग देखील त्यांनी यावेळी सांगितला होता की, शंभर वर्षाचे जुने झाड रस्त्याच्या मध्ये येत असल्याने काढून टाकले जाणार होते. ते झाड देवाईत आणून लावण्यात आले होते. झाड मुळासकट काढून पुन्हा लावणे खूप खर्चिक काम होते, पण ते झाड जगणं खूप महत्त्वाचं होतं. वृक्ष संवर्धनाची त्यांची तळमळ वेळोवेळी त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली आहे.