कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. अंतरा आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांना मालिकेतून भावली आहे. या मालिकेत मेघची भूमिका साकारणारा कलाकार नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. मालिकेत मेघची भूमिका अभिनेता रौनक शिंदे याने साकारली आहे. काही दिवसांपूर्वी पुष्पा चित्रपटातील उ अंटा वा या गाण्यावर नवरदेव नवरीने डान्स केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हे नवदाम्पत्य म्हणजेच अभिनेता रौनक शिंदे आणि त्याची पत्नी प्राची मोरे होय. त्यांच्या लग्नाची खास आठवण म्हणून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता.
हा व्हिडीओ अनेकांना आवडला असल्याच्या प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या होत्या. २ फेब्रुवारी २०२२ रोजी रौनक शिंदे आणि प्राची मोरे यांचा मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला. रौनक शिंदे हा अभिनेता तसेच दिग्दर्शक आहे. जीव माझा गुंतला या मालिका व्यतिरिक्त रौनक स्वराज्यजननी जिजामाता, फ्रेशर्स या मालिकांमध्ये झळकला आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या रौनकने एकांकिका स्पर्धांमधून सहभाग दर्शवला आहे. इथूनच त्याला प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकातून झळकण्याची संधी मिळाली. भास आभास, स्वर्गीय छोटाला, ऑल द बेस्ट २, दिनूच्या सासूबाई राधाबाई, प्लॅंचेट या नाटकातून त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
रौनकची पत्नी प्राची मोरे ही व्यावसायिक फोटोग्राफर आहे. पाईन अँप्पल या स्टुडिओ मध्ये ती फोटोग्राफीचा व्यवसाय चालवत आहे. याशिवाय बॉम्बे मिल्स आणि मोम्मोलेट्स असे कपड्यांचे आणि विविध प्रकारच्या चॉकलेटच्या व्यवसायात ती सक्रिय आहे. रौनक आणि प्राची यांचा विवाह सोहळ्यातील त्यांचा नृत्याचा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांनी त्यांना मनसोक्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र हे दोघेही मराठी सृष्टीशी जोडले असावेत याचा अंदाजही त्यावेळी कोणाला आला नव्हता. प्राची आणि रौनक या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.