तुमची मुलगी काय करते या थरारक मालिकेत एसीपी भूषण शेरेकर यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. ही भूमिका साकारून अभिनेते नितीन भजन प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. नितीन भजन हे मूळचे नागपूरचे, त्यांना चित्रकलेची विशेष आवड होती त्यासाठी त्यांनी फाईन आर्टस्चे धडे गिरवले. कॉलेजमध्ये असताना रंगभूमीशी ते जोडले गेले. इथूनच राज्य नाट्य स्पर्धांमधून त्यांनी सहभाग दर्शवला. दरम्यान पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नोकरी देखील केली, मात्र नोकरीत फारसे मन रमेना म्हणून मग पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राला देण्याचे ठरवले.
अभिनयाचे शास्रोक्त शिक्षण घेण्यासाठी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवला. डॅडी, नागरिक, अ नाईट लॉंग, सुमी अशा हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. पुढे काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टीने नितीन भजन यांनी व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. नागपूर जिल्ह्यातील कातोळ येथील लिंगा गावात एक टुमदार हवेली त्यांनी उभारली. चित्रपट, मालिकांच्या शूटिंगसाठी तसेच डेस्टिनेशन वेडिंग, फोटो शूट साठी त्यांनी हे ठिकाण भाडेतत्त्वावर देण्याचे ठरवले. नितीन भजन यांची पत्नी वैखरी पाठक ही देखील अभिनेत्री आहे हे बहुतेक जणांना माहीत नसावे. वैखरी पाठक या नाटक, चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री आहेत. हसवाफसवी नाटकात वैखरीने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.
झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली लोकमान्य मालिकेत ती एक महत्वाचे पात्र साकारत आहे. गोपिकाबाईंचे पात्र साकारत असताना तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना यातून पाहायला मिळत आहेत. नाटक, मालिका हा प्रवास सुरु असताना वैखरीने अभिनय क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला. लग्नानंतर कुटुंबाची जबाबदारी, मुलाचे पालनपोषणाची जबाबदारी यातून आता वेळ काढून ती पुन्हा मालिकेकडे वळलेली आहे. लोकमान्य मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे वैखरीने साकारलेली पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मालिकेतील पुनरागमनासाठी तिचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.