लागीरं झालं जी फेम आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण याने आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन हटक्या पद्धतीने केलेले पाहायला मिळत आहे. एक पोस्ट शेअर करत नितीशने म्हटले आहे की, “आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, आमच्या जीवाला धोकाय. मी आत्तापर्यंत सोशल मेडियावर माझ्या रिलेशन बद्दल सांगितलं नाही. कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. मला खरतरं हे असं सगळ्यां समोर सांगायचं नव्ह्तं पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून हे सांगावं लागतंय.” असे म्हणत त्याने आपल्या सोयरीक या आगामी चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.
चित्रपटाकडे लक्ष्य वेधून घ्यावे म्हणून नितीने आणि पर्यायाने चित्रपटाच्या टीमने ही हटके युक्ती वापरली आहे. नितीश सोबत अभिनेत्री मानसी भवालकर हिने देखील अशीच एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. सोयरीक या आगामी चित्रपटाचे गेल्या वर्षभरापासून काम चालू होते. परंतु असे चित्रपटाचे हटके प्रमोशन करणे नेटकऱ्यांना मात्र कुठेच रचलेले दिसत नाही. तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिलेल्या पाहायला मिळत आहेत. असे प्रमोशन जर कोणी करत असेल तर एखादा कलाकार अशाच कोणत्या अडचणीत सापडला, तर तो प्रमोशनचा भाग म्हणून कोणीच त्याला मदत करू शकणार नाही. त्यामुळे लांडगा आला रे आला अशी त्याची गत व्हायला नको. अशी भूमिका प्रेक्षकांनी घेतलेली पाहायला मिळत आहे.
तर अनेकांनी नाराजी दर्शवत चित्रपट पाहण्यास नकार दिलेला पाहायला मिळाला. अशा हटके स्वरूपाच्या प्रमोशनचा वापर अभिनेता संग्राम समेळ याने देखील केला होता. मला एक मुलगी त्रास देतेय दिवसातून शंभर ते दीडशे वेळा फोन करतीये. अशा स्वरूपाचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या या व्हिडीओ वरून अनेकांनी त्याला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. स्वीटी सातारकर या नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार होता, त्यानिमित्ताने त्याने तसा व्हिडीओ बनवला असल्याचे नंतर अनेकांच्या लक्षात आले. तेव्हाही अशा हटके प्रमोशनवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. त्यामुळे असे हटके प्रमोशन करणे कधीतरी महागात पडू शकते, असे आता नेटकऱ्यांनी चित्रपटांच्या टीमला सुचवले आहे.