मराठी सृष्टीला मागील काही दशकात अनेक हरहुन्नरी कलाकार लाभले. त्यातील बऱ्याचशा कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे, तर काही कलाकार मंडळी आजारपणामुळे या क्षेत्रापासून दूर आहेत. मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ गाजवणारे अभिनेते चेतन दळवी हे देखील गेल्या काही वर्ष भरापासून अभिनय क्षेत्रापासून अलिप्त आहेत. चेतन दळवी यांनी विनोदी अभिनेते म्हणून मराठी सृष्टीत एक वेगळी छाप सोडली होती. अगदी विजय कदम, विजय पाटकर, विजय चव्हाण, भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांच्या तोडीसतोड भूमीका त्यांनी आपल्या अभिनयाने वठवल्या होत्या. पती सगळे उचापती या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.
तुझ्या वाचून करमेना, जावई बापू जिंदाबाद, नवरी मिळे नवऱ्याला, गाव थोर पुढारी चोर, खरं कधी बोलू नये, फेका फेकी, वाजवू का, गंमत जंमत, लग्नाची वरात लंडनच्या घरात. एका वरचढ एक अशा जवळपास ८० हुन अधिक चित्रपटातून त्यांनी सहाय्यक, विनोदी तसेच नाटकातून प्रमुख भूमिका साकारल्या. चेतन दळवी यांचे कलाक्षेत्रात पाऊल पडले त्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, प्रशांत दामले यांची साथ त्यांना मिळाली. या कलाकारांनी टूरटूर नाटकातून काम करत असताना रंगभूमी गाजवली होती. ९० च्या दशकात नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. मात्र गेल्या वर्षी आजारपणामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. दरम्यानच्या काळात कुठल्याही कलाकाराकडे काम नव्हते.
मात्र सर्व सुरळीत चालू झाल्यानंतर चेतन दळवी एका नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकादरम्यान चेतन दळवी यांना हृदयाचा स्ट्रोक आला होता. आपल्या तब्येतीकडे लक्ष्य देता यावे म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाल्याने पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. चित्रपट, नाटकातून काम मिळावे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. चेतन दळवी हे सध्या आपल्या पत्नीसह विरारला राहतात. हिमानी आणि जुही या त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा काम मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. यात चेतन दळवी यांना लवकरच यश मिळो आणि एका चांगल्या भूमिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येवो हीच सदिच्छा.