सगळीकडे गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. अशातच आता गणेश उत्सवानिमित्त साठी नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच एका चिमुरड्याने शालेय पोशाखात एका गाण्यावर रील तयार केले आहे. हे हटके रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चिमुरड्याचा रिल्स मधला निरागस अभिनय पाहून अनेकांनी त्यांचं मोठं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. आमच्या पप्पानी गणपती आणला, हे गाणं गेल्या वर्षीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.
शालेय विद्यार्थ्यांच्या रीलमुळे हे गाणं सर्वदूर लोकप्रिय होताना आता दिसत आहे. आतापर्यंत ह्या गाण्याला ३४ लाखांहून अधिक व्ह्युव्हज मिळाले आहेत. खरं तर गाणं गायलं होतं माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन बालगायकांनी. मंगेश घोरपडे आणि मनोज घोरपडे यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. माऊली प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत माझ्या पप्पानी गणपती आणला या गाण्याचे लेखन मनोज घोरपडे यांनी केले आहे. तर मंगेश घोरपडे यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. सर्वसामान्यांना आपलीशी वाटावी अशी गाण्याची क्रिएटिव्हीटी करण्यात आली आहे. त्याचमुळे या गाण्याचा साधेपणा प्रेक्षकांना भावला आहे. हे गाणं आता प्रत्येकजण सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी वापरत आहे.
आमच्या पप्पानी गणपती आणला या गाण्याला लोकप्रियता मिळाल्यानंतर मंगेश घोरपडे यांनी आणखी काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली. गरबा खेळाला आली, प्रेमाची बॉटल, माझा आयटम आहे झकास या गाण्यालाही प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मंगेश घोरपडे यांच्याच दोन्ही मुलांनी ही गाणी गायली आहेत. आणि त्यांच्याच कुटुंबावर गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या गाण्यात चिमुरडे गायक माऊली आणि शौर्या दोघेही झळकत आहेत. सोशल मीडियावर हे गाणं अनेक जणांनी सर्च केलं आहे. तर रील बनवणाऱ्यानाही हे गाणं भलतंच भावलं आहे. जो तो आता या गाण्यावर रिल्स बनवू लागल्याने ऐन गणपतीत हे गाणं तुफान गाजणार असंच चित्र दिसत आहे.