कलर्स मराठी वाहिनीवर आई मायेचं कवच ही मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिने सुहानीचे मुख्य पात्र साकारले तर भार्गवी चिरमुले तिच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेता तेजस डोंगरे, वरद चव्हाण, विजय गोखले, सचिन देशपांडे यांनी देखील या मालिकेत महत्वाची भूमिका बजावली आहे. मालिकेचे हटके कथानक वास्तवाला अनुसरून आहे असे म्हणायला हरकत नाही. सध्याच्या घडीला आपली मुलगी चुकीचे पाऊल उचलते का या काळजीत असणारी आई, आपल्या मुलीला शोधण्यासाठी काय काय प्रयत्न करते हे या मालिकेतून दाखवले आहे.
त्यामुळे मालिका अधिकच उत्कंठा वाढवणारी ठरली आहे. मालिकेतील सुहानीची भूमिका अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिने साकारली आहे, आज तीच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. अनुष्का पिंपुटकर ही मॉडेल तसेच चित्रपट मालिका अभिनेत्री आहे. आई मायेचं कवच ही तिने अभिनित केलेली पहिलीच टीव्ही मालिका आहे. अनुष्काचे शालेय तसेच पदवीचे शिक्षण पुण्यातून झाले आहे. भारतीय विद्या भवन, गरवारे कॉलेज तसेच मॉडर्न कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेजमध्ये असतानाच मॉडेलिंगचे वेध तिला लागले. नामांकित कंपनीसाठी अनुष्काने रॅम्पवॉक केलं आहे. विविध सौंदर्य स्पर्धांमधून तिला बक्षिसं देखील मिळाली आहेत.
फेस ऑफ सिजन मॉल, मिस इंडियाचा बेस्ट स्माईल, मिस स्टाईल आयकॉन असे अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत. मॉडेलिंग करता करता अनुष्काला चित्रपटात झळकण्याची नामी संधी मिळाली. सुश्रुत भागवत दिग्दर्शित “८ दोन ७५” या आगामी मराठी चित्रपटात अनुष्का महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे मुख्य भूमिकेत असून आनंद इंगळे, संजय मोने, विजय पटवर्धन या कलाकारांची साथ त्यांना मिळणार आहे. हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असणार आहे ८ दोन ७५ या अंकामागचं गुपित चित्रपटातून उलगडताना दिसणार आहे. अनुष्का या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची अजून तारीख जाहीर झाली नसली तरी, नावावरूनच हा चित्रपट प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ठरला आहे. चित्रपटातून काम केल्यानंतर अनुष्काला आई मायेचं कवच या कलर्स मराठीवरील मालिकेत मुख्य भूमिकेत झळकण्याची नामी संधी मिळाली आहे. अनुष्काने साकारलेली सुहानी आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवलेली पाहायला मिळते आहे. तिने आई आणि लेकीच्या या मायेच्या नात्यातील भावपूर्ण अभिनय अप्रतिम रित्या सादर केला आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने काळजीवाहू आईची भूमिका उत्तम पद्धतीने रंगवली आहे. आगामी चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकांसाठी अनुष्का पिंपुटकर हिला मनपूर्वक शुभेच्छा.