गेल्या काही महिन्यांपासून आदेश बांदेकर हे झी मराठीवरील महा मिनिस्टर या कार्यक्रमात व्यस्त होते. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यानंतर आदेश बांदेकर राजकारणात देखील सक्रिय झालेले पाहायला मिळाले. आदेश बांदेकर हे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षविरोधात बंड पुकारले, यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशा परिस्थितीत आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षे यांच्यावर संताप व्यक्त करत ‘हा शरद पोंक्षे तूच ना?’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे का म्हटले याला एक खास कारण आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी लिहिलेले ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
या पुस्तकात त्यांनी कॅन्सरवर कशी मात केली, कोणाची मदत मिळाली असे वेगवेगळे अनुभव त्यात लिहिले आहेत. या कठीण प्रसंगात त्यांना एकनाथ शिंदे यांनी मोलाची साथ दिली होती असेही लिहिले आहे. ‘हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं, सख्ख्या भावसारखे ते माझ्या मागे उभे राहिले’. असे या पुस्तकात लिहुन एकनाथ शिंदे सोबतचा एक फोटो या पुस्तकात छापण्यात आला आहे. कॅन्सरवर मात केल्यानंतर शरद पोंक्षे यांनी मीडियाला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी शरद पोंक्षे यांनी त्या मुलाखतीत आदेश बांदेकर यांचा मला सर्वात आधी फोन आला असे म्हटले होते.
त्यांनीच मला चांगल्या डॉक्टरांकडे पाठवले. उद्धव ठाकरे यांनी देखील मला फोन करून पैशाची काळजी करू नका असे म्हणून मोठा धीर दिला होता. असे शरद पोंक्षे या मुलाखतीत म्हणताना दिसले. त्या व्हिडीओवरून आदेश बांदेकर यांनी ‘हा शरद पोंक्षे तूच ना?’ अशा खोचक शब्दांत शरद पोंक्षे यांचा समाचार घेतला आहे. आदेश बांडेकरचा हा राग पाहून शरद पोंक्षे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे की, ‘मित्रा आदेश पुस्तक वाच. त्यात ज्याने ज्याने मदत केलीय त्या प्रत्येकाचे आभार मानलेत मी. मी तोच शरद पोंक्षे आहे प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा. मी कधीच काहीही विसरलो नाही, विसरणार नाही. पक्षापलीकडची मैत्री आहे आपली. सोबत पुस्तकातला फोटो टाकत आहे.’