प्रिया मराठे हिने आजवर विरोधी भूमिका साकारून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत सुद्धा ती अशाच धाटणीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. मोनिकाच्या भूमिकेला प्रिया मराठे आता निरोप देत आहे. खरं तर प्रिया मराठेने आरोग्याच्या कारणास्तव ही मालिका सोडली असल्याचे म्हटले आहे. मालिकेला वेळ देत येत नसल्याने प्रियाने ही मालिका सोडली आहे. पण या भूमिकेवर प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं ते पाहून प्रिया भारावून गेले होती. मोनिकाची भूमिका विरोधी होती मात्र ती साकारायला मला खूप मज्जा वाटत होती.
प्रेक्षकांनीही या भूमिकेवर प्रेम दाखवलं पण मी या मालिकेसाठी कुठेतरी वेळ देऊ शकत नव्हते, त्यामुळे मी ही मालिका सोडत आहे असे ती म्हणते. प्रिया मराठेने साकारलेली मोनिकाची भूमिका आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारी निभावणार आहे. तेजस्विनी लोणारी सध्या अफलातून या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तेजस्विनीसोबत जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, भरत दाभोळकर, रेशम टिपणीस, जेस्सी लिवर असे बरेचसे कलाकार झळकताना दिसणार आहेत. या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी तेजस्विनी आता छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. मराठी बिग बॉसच्या घरात हाताला दुखापत झाल्यामुळे तेजस्विनीला शो अर्धवट सोडावा लागला होता.
तिच्या या अशा अचानकपणे बिग बॉस सोडण्यामुळे तिच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांचा अपेक्षा भंग झाला होता असे म्हणावे लागेल. खरं तर शो मधील सर्व टास्क मध्ये सलग चांगला परफॉर्मन्स देत तिने सर्वांची मने जिंकली होती. त्यामुळे तेजस्विनी हीच बिग बॉसच्या ट्रॉफीची खरी दावेदार व्हावी अशी प्रेक्षकांची मनापासून अपेक्षा होती. शो मधून बाहेर गेल्यानंतरही बऱ्याच प्रेक्षांनी ती पुन्हा येईल अशी खात्री वर्तवली होती. आता तेजस्विनी मोनिकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने तिचे चाहते खूपच उत्साही आहेत. मोनिकाची भूमिका प्रिया मराठे हिने तीच्या अभिनयाने गाजवली होती. त्यामुळे तेजस्विनीसाठी ही भूमिका म्हणजे एक मोठे आव्हानच ठरणार आहे. हे आव्हान ती कशी पेलते हे लवकरच पहायला मिळणार आहे.