मराठी बिग बॉसच्या पहिल्या वहिल्या सिजनची विजेती ठरलेली मेघा धाडे हिने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. काल पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या एका सोहळ्यात मेघा धाडे हिने भाजपाचा झेंडा हाती घेतलेला पाहायला मिळाला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मेघा धाडे हिने पक्ष प्रवेश स्वीकारला. यावेळी सरचिटणीस विक्रांत पाटील, विजय चौधरी, सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे याही उपस्थित राहिल्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपा मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता मेघा धाडे हिने भाजपा मध्ये प्रवेश करत राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलेले आहे.
राजकारणार येण्याचे कारण विचारल्यावर मेघा धाडे म्हणते की, हे क्षेत्र मी करिअर म्हणून बघत नाही तर ते एक कर्तव्य म्हणून मी त्याकडे बघते. एक सुजाण नागरिक म्हणून काही जबाबदाऱ्या उचलाव्या लागतात. सामाजिक जीवनात जगत असताना आपल्या आजूबाजूला खूप समस्या असतात. त्या कोणीतरी सोडवायला हव्यात असं वाटत असतं. एक कलाकार म्हणून त्यांच्याही काही समस्या आहेत. हिरोईन सारखं केस उडवून झाडाच्या मागे फिरण्यापेक्षा या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हे समजून एक खारीचा वाटा म्हणून मी ही जबाबदारी उचलली आहे. सुदृढ समाज निर्माण करण्याकरता आपलाही हातभार लागला पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा एक अथांग समुद्र आहे. ज्याची महती जगभर आहे आणि जगातला हा सर्वात मोठा पक्ष आहे.
एवढ्या मोठ्या महासागरातील मी एक छोटासा थेंब झाले आहे. पण आता हा छोटासा थेंब पुढे जाऊन काय काय कमाल करतोय हे तुम्हाला पाहायला मिळेल. अभिनय हे माझं पहिलं प्रेम आहे आणि ते माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे मी सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून मी कला क्षेत्राशी निगडित राहणारच आहे. अभिनयाच्या संधी जर आल्या तर त्याही मला करायच्या आहेत. राजकारण हे करिअर म्हणण्यापेक्षा मी ते एक कर्तव्य म्हणून बघणार आहे. राजकारण हे अगदी ५ टक्केच असणार आहे आणि ९५ टक्के समाजकारण असणार आहे एवढं नक्की. मागील काळात लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, त्यांच्या आरोग्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. एवढंच नाही तर कला क्षेत्र हे बेभरवशाचे क्षेत्र आहे.
आता हाताला काम नसेल तर तो याच क्षेत्रात राहून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न कसा मिटवू शकतो यावर काम करणे गरजेचे आहे. या सगळ्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, त्यासाठी तुमचे आशीर्वाद पाठीशी असावेत असे मेघा धाडे म्हणते. मराठी मालिका, चित्रपटातून काम केल्यानंतर मेघाने हिंदी सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. मराठी बिग बॉसचा पहिला सिजन सुरू झाला, त्या सिजनमध्ये मेघा धाडे हिने सहभाग दर्शवला होता. या पहिल्याच सिझनची ती विजेती ठरली होती. मराठी बिग बॉसनंतर मेघा धाडे हिंदी बिग बॉसच्या १२ व्या सिजनमध्ये दिसली. त्यानंतर मराठी बिग बॉसच्या सिजन २ आणि नंतर सिजन ३ मध्येही ती गेस्ट अपिअर्न्स म्हणून पाहायला मिळाली.