टीडीएम चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र चित्रपटाला शो मिळत नसल्याने कलाकारांसह दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना आपले अश्रू अनावर झाले होते. आपल्या महाराष्ट्रात मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसल्याने मराठी सिनेमाची गळचेपी केली जाते असे आरोप भाऊराव कऱ्हाडे यांनी थिएटर मालकांवर लावले होते. भाऊराव कऱ्हाडे यांनी ख्वाडा आणि बबन सारखे ग्रामीण भाषेचे बाज असलेले दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यांच्याच चित्रपटाला महाराष्ट्रात डावललं जातंय अशी ओरड सुरू झाली. टीडीएम चित्रपट बनवण्यासाठी भाऊरवांनी कर्ज काढले होते.
कर्जाची भलीमोठी रक्कम कशी फेडायची असा बिकट प्रश्न त्यांच्यामोर उभा होता. त्यामुळे काही काळासाठी चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. यावेळी चित्रपटाचा नायक पृथ्वीराज थोरात यालाही आपले अश्रू अनावर झाले. पृथ्वीराज हा एका डोंगराळ खेडेगावातून शहरात आला होता. आपल्या मुलाची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून जवळचे दागिने गहाण ठेवून त्याच्या आईने कर्ज काढले होते. या कर्जाच्या पैशातून पृथ्वीराज शहरात दाखल झाला होता. ऑफिसबॉय म्हणून काम करत असतानाच भाऊराव ने त्याला आपल्या चित्रपटातून नायकाची संधी देऊ केली होती. तेव्हा आपण आता चित्रपटात झळकणार म्हणून तो खूपच खुश होता. पण जेव्हा चित्रपटाला स्क्रीन मिळणे कठीण होऊ लागले, तेव्हा पृथ्वीराजला रडूच कोसळले.
माझ्या आईने खूप काबाड कष्ट करून मला इथं पाठवलंय, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझं गाव एकमद खेड्यात डोंगरात आहे, माझी आई शिकलेली नाही. जेव्हा २०१३ ला इकडं आलो तेव्हा तिनं कर्ज काढून मला इकडं पाठवलं आहे. वर्षभर माझी आई काबाडकष्ट करून ते कर्ज फेडत होती. माझा चित्रपट येतोय म्हणून ती खूप खुश होती. पण जेव्हा तिला सिनेमा रद्द झाल्याचं कळलं तेव्हा तिने फोन केला आणि मला तिचे फक्त हुंदके ऐकू येत होते. आई काहीच बोलू शकली नाही. ही गोष्ट मला सहन होत नाहीये. माझ्याकडे शब्दच नाहीयेत बोलायला. पृथ्वीराजच्या या भावुक प्रतिक्रियेनंतर टीडीएम चित्रपटाला प्रेक्षकांनी दिग्दर्शकांनी पाठिंबा दर्शवला होता. एवढेच नाही पुण्यातील शिरूर तालुक्यातील प्रेक्षकांनी चित्रपटाला पाठिंबा म्हणून ट्रॅक्टर रॅली काढली होती.
पण आता आनंदाची बातमी अशी आहे की टीडीएम चित्रपट येत्या ९ जून रोजी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतलेला आहे. दोन दिवसांपूर्वी ही बातमी त्यांनी जाहीर केली होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न भाऊरवांनी केला आहे. आपल्या चित्रपटाला जास्तीतजास्त प्रेक्षक यावेत अशीही ते विनंती करताना दिसत आहेत.