३१ मार्च १९७२ रोजी पिंजरा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, त्याला आज ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने चित्रपट संबंधित काही खास आठवणींना उजाळा देऊयात. मराठी सृष्टीतला पहिला रंगीत चित्रपट म्हणून पिंजरा या चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही शांताराम यांचे होते. तर नायिका संध्या असणार हे अगोदरच ठरले होते. चित्रपटाच्या नायकाची शोधाशोध सुरू होती. त्यावेळी डॉ श्रीराम लागू हे नाटकातून काम करत असत. नाटकातील त्यांच्या भूमिकेवर भरभरून लिहिले जाऊ लागले हे पाहून नायकाची भूमिका श्रीराम लागू साकारणार हे ठरवण्यात आले.
याचदरम्यान निळू फुले यांचेही नाव चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यामुळे त्यांनाही चित्रपटात महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले. राम कदम यांचे संगीत, जगदीश खेबुडकर यांची गीतं, रंजन साळवी यांचे नृत्य दिग्दर्शन आणि लता दीदी, उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी, सुधीर फडके यांचा आवाज असे सगळेच सूर एका तालात जमून आले होते. चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथे पार पडले. त्यावेळी हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी २० लाख रुपये एवढा खर्च आला असल्याचे सांगितले जाते. आता प्रश्न होता प्रेक्षकांना चित्रपट गृहात खेचून कसे आणायचे. त्यासाठी एक नामी शक्कल लढवण्यात आली. पुण्यातील रिक्षांवर फक्त पिंजरा एवढेच लिहून प्रमोशन करण्यात आले. लोकांना याविषयी कुतूहल वाटायचे.
ठरल्याप्रमाणे ३१ मार्च १९७२ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला. कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा सर्वच ठिकाणी चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची गाणी तर इतकी हिट झाली की लोकांनी त्या गाण्यांवर पुस्तकं लिहून काढली. प्रेक्षक अक्षरशः गाण्यांवर ठेका धरत थिएटरमध्ये पैसे उडवत होते. पिंजरा चित्रपटाची सिल्व्हर ज्यूबली झाली तेव्हा एक व्यक्ती व्ही शांताराम यांना भेटायला आला होता. तो व्यक्ती पंचवीस आठवड्यापासून रोज चित्रपट पाहत होता. चित्रपटाची तिकिटं तो ब्लॅकने विकायचा. या पैशातून त्याने आपल्या मुलांची शिक्षणं केली, घर घेतलं असे तो त्यांना सांगू लागला. याचे साक्षीदार स्वतः किरण शांताराम होते, त्यांनीच हा किस्सा गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितला होता.