ख्वाडा, बबन आणि आता रौंदळ सारख्या भारदस्त आणि दर्जेदार चित्रपटामुळे भाऊसाहेब शिंदे सारखा रांगडा नायक मराठी सृष्टीला मिळाला. खरं तर एक सर्वसामान्य शेतकरी ते चित्रपटाचा नायक बनण्याचा भाऊसाहेब शिंदेचा हा प्रवास उल्लेखणीय कामगिरी करणारा ठरला आहे. कारण केवळ दोन ते तीन चित्रपट करून भाऊसाहेबला चक्क आता साऊथच्या चित्रपटाची सुद्धा ऑफर मिळु लागली आहे. ख्वाडा हा भाऊसाहेब शिंदेचा अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. हा चित्रपट त्याला ओघानेच मिळाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना तो असिस्ट करत होता. ख्वाडा चित्रपटातील सर्व पात्रांची निवड जवळजवळ पूर्ण करण्यात आली होती.

फक्त नायकाची निवड करणे बाकी होते. एक दिवस भाऊरावची नजर भाऊसाहेबकडे गेली आणि तू अजून थोडं वजन वाढवलं तर तुला चित्रपटाचा हिरो करतो अशी ऑफरच देऊ केली. त्यावेळी दीड महिन्यात एवढं वजन वाढवणं भाऊसाहेबने शक्य नसल्याचं म्हटलं. पण ही संधी जाऊ नये म्हणून त्याने हे चॅलेंज स्वीकारलं. दीड महिन्यात भाऊसाहेबचे वजन ७७ किलो झालं होतं. त्यानंतर ख्वाडा चित्रपटात त्याला नायकाची संधी मिळाली. या चित्रपटानंतर भाऊराव कऱ्हाडे यांनी पुढच्या चित्रपटासाठी भाऊसाहेबला पुन्हा एकदा संधी दिली. बबन मध्ये रांगडा आणि रोमँटिक नायक साकारताना भाऊसाहेबला मात्र खूप अवघडल्यासारखं झालं. कारण शाळेत, कॉलेजमध्ये शिकताना कधीही मुलींशी न बोलणारा भाऊसाहेब चक्क नायिकेसोबत रोमांस करताना दिसणार होता.

यासाठी त्याने मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या जेणेकरून ही भूमिका तो चांगली वठवू शकेल. भाऊसाहेब शिंदे हा मूळचा नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणे गावचा. चित्रपट नसेल तेव्हा तो गावाकडे शेती करतो. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तो खूप कमी राहतो. इथे आला की रात्रीच आपल्या गावची वाट धरतो. त्याचा ग्रामीण बाज असलेला रौंदळ हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. चित्रपटाला ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांची व्यथा या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी पिकवतो, पिकवणं त्याच्या हातात आहे पण त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्यातून रौंदळ घडतो असे भाऊसाहेब म्हणतो.
हा चित्रपट करत असताना भाऊसाहेबला साऊथच्या चित्रपटाची ऑफर आली होती. पण त्याने ती नाकारली. मला मराठी चित्रपटाचा नायक म्हणून राहायचं आहे. मी आधी महाराष्ट्रीयन आहे, मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी मला चित्रपट करायचा आहे. हा चित्रपट हिंदीतही बनवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या मातीची ही गोष्ट बाकीच्या राज्यापर्यंत पोहोचली पाहिजे. इतर भाषिक चित्रपट आपल्याकडे चालतात मग महाराष्ट्रातला चित्रपट दुसऱ्या राज्यात चालायला पाहिजे असे मला वाटते. भाऊसाहेबच्या या निर्णयामुळे अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत.