दामिनी ही मराठी सृष्टीतील सर्वात जास्त गाजलेली दैनंदिन मालिका ठरली होती. १९९७ ते २००१ या काळात मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. प्रतीक्षा लोणकर हिने दामिनीची भूमिका साकारली होती. मालिकेचे एक वैशिष्ट्य असे होते की हर्षदा खानविलकर, किरण करमरकर, अविनाश खर्शिकर, महेश मांजरेकर, रविंद्र बेर्डे, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आसावरी जोशी अशा मराठी सृष्टीतील जवळपास सर्वच कलाकारांनी मालिकेत काम केले होते. सत्याची बाजू मांडणारी, तडफदार, समस्यांचे निरसन करणारी निर्भीड दामिनी लोकांनी आपलीशी केली होती. त्यामुळे अनेकजण मंत्रालयात कामं अडकली म्हणून ते प्रतीक्षा लोणकरकडे फाईल घेऊन यायचे.
तेव्हा मी या मालिकेत फक्त पात्र करतीये अशी समजूत तिला घालावी लागायची. या मालिकेत मयुरी नावाचे एक पात्र होते. एका अतिप्रसंगामुळे मयुरीवर आलेले संकट दामिनीमुळे टळते. ही मयूरी आता मराठी सृष्टीतून बाजूला झाली होती. त्यामुळे ती कुठे असेल याबाबत उत्सुकता आहे. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. दामिनी मालिकेत मयुरीची भूमिका अभिनेत्री पुजांगी बोरगावकर हिने साकारली होती. या मालिकेअगोदर अनेक चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पुजांगी ही डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद शाळेत असल्यापासूनच नाटकातून काम करत होती. तिची आई अरुणा बोरगावकर या दिग्दर्शिका, निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. जयदेव हट्टंगडी यांच्या आविष्कार नाट्यसंस्थेतून तिने अभिनयाचे धडे गिरवले.
संत गजानन शेगाविचा या आईच्याच चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून काम केले. चंद्रलेखाच्या ऑल द बेस्ट या नाटकाचे तिने १५० प्रयोग केले. ईना मीना डिका, झपाटलेल्या बेटावर, हसरी, लक्ष्मी, संघर्ष, शुभमंगल सावधान, हम पांच इंद्रधनू अशा चित्रपट, मालिका मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. दामिनी मालिकेमुळे तिने साकारलेली मयुरीची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. मानसशास्त्राची पदवी घेतलेल्या पुजांगीला बालकलाकारांना घेऊन बालनाट्य करायची इच्छा होती. तसा तिचा प्रवास देखील सुरू झाला. विनोद पांडे सोबत लग्न झाल्यानंतर पुजांगीने अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. दोन मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळत ती आता घरसंसरात रमली आहे. मात्र असे असले तरी यापुढेही पुजांगी मराठी चित्रपट सृष्टीतली नायिका म्हणून ओळखली जाणार आहे.