बॉलिवूड चित्रपटात आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी नशीब आजमावलं आहे. यात कोणाला यश मिळाले तर कोणाला अपयश पचवावे लागले. आपल्या कारकिर्दीत केवळ १२ चित्रपट देऊनही ही अभिनेत्री प्रेक्षकांना दाखल घ्यायला लावणारी ठरली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री बॉलिवूड सृष्टीला रामराम ठोकून घर संसारात रमली आहे. ही अभिनेत्री आहे अंतरा माळी. अंतरा माळी हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले ते तेलगू चित्रपटातून. मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ चित्रपटाने अंतरा प्रकाशझोतात आली होती. माधुरी दीक्षित बनण्याची स्वप्न पाहणारी एक मुलगी अभिनय क्षेत्रात कशी दाखल होते, याची कहाणी अंतराने चित्रपटात साकारली होती.
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मात्र फारशी कमाल घडवू शकला नव्हता. त्यानंतर गायब, डरना मना है, रोड, नाच अशा मोजक्या चित्रपटातून तिने प्रमुख भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र एक नायिका म्हणून अंतराला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती. तिच्या जोडीला करिश्मा कपूर, करीना कपूर अशा तगड्या नायिका स्पर्धेत टिकून होत्या. त्यामुळे अंतराला अभिनेत्री म्हणून खूप कमी लोकप्रियता मिळाली. आपल्या कारकिर्दीत तिने जेवढे चित्रपट केले तेवढे सगळे फ्लॉप ठरले. याच कारणामुळे अभिनय क्षेत्रातून तिने काढता पाय घेण्याचे ठरवले. २००९ साली जिक्यु मॅगझीनचे संपादक असलेल्या कुरिन सोबत तिने प्रेमविवाह केला आणि घर संसारात रमण्याचा निर्णय घेतला. २०१२ रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र यानंतर अंतरा फारशी कुठे चर्चेत पाहायला मिळाली नाही.
अंतराला मुलगी झाली त्याच दरम्यान तिचे वडील मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागत फिरत होते अशी चर्चा सर्वदूर पसरली. अंतराचे वडील जगदीश माळी हे प्रसिद्ध छायाचित्रकार होते. वडील क्रिएटिव्ह आर्टिस्ट असल्याने एकाकी आयुष्य जगणे त्यांना पसंत होते. अंतरा आपल्या वडिलांची खूप काळजी घ्यायची. केवळ खाजगी कारणास्तव तिचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले होते. माझे वडील वेडे नाहीत आणि गेल्या १५ वर्षांपासून त्यांनी दारूला स्पर्श सुद्धा केलेला नाही. त्यांना क्रोनिक लिव्हर डिसऑर्डरचा त्रास आहे. सहा सात महिन्यातून त्यांची तब्येत बिघडते तेव्हा त्यांना काय करावे हे सुचत नसते. वडिलांना वेडं ठरवून ३५ वर्षांच्या त्यांच्या करकीर्दीवर डाग लावू नका असे आवाहन तिने मीडियाला केले होते. वडिलांच्या पश्चात आता नवरा आणि मुलीसोबत अंतरा सुखी संसारात रममाण झालेली आहे.