Breaking News
Home / जरा हटके / अभिनयातला विनोदवृक्ष.. चित्रपटात घरगड्याची भूमिका राखून ठेवलेले कलावंत
chandrakant mandhare vasant shinde
chandrakant mandhare vasant shinde

अभिनयातला विनोदवृक्ष.. चित्रपटात घरगड्याची भूमिका राखून ठेवलेले कलावंत

​सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला. सांगत्ये ऐका या तमाशा प्रधान चित्रपटातलं हे​ गाणं गाजलं ते अभिनेते वसंत शिंदे यांच्यामुळं. खरं तर चित्रपटातून विनोदी भूमिका करणे आणि खऱ्या आयुष्यात त्या जगणे. या दोन्ही गोष्टी वसंत शिंदे यांनी आपल्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत जपल्या होत्या. आज वसंत शिंदे यांच्याबद्दल काही अपरिचित खास गोष्टी जाणून घेऊयात. वसंत शिंदे यांनी चित्रपटातून घरगड्याच्या भूमिका गाजवल्या. या भूमिकेसाठी आपल्याला पेटंट मिळालय अशी मिश्किल प्रतिक्रिया ते देत असत. खऱ्या आयुष्यातही ते आपल्या सभोवतालचे वातावरण नेहमी हलकेफुलके ठेवत असत.

chandrakant mandhare vasant shinde
chandrakant mandhare vasant shinde

चेष्टा मस्करी करणे, मित्रमंडळींची फिरकी घेणे पण या खोडसाळपणात मी कधी विष कालवलं नाही हे ते अधोरेखित करतात. अहंकाराचा वारा कधी लागू दिला नाही त्यामुळे कायम पाय जमिनीवरच ठेवले असेही ते आपल्या स्वभावाबद्दल बोलतात. १​​४ मे १९१२ रोजी नाशिक येथील भंडारदरा या गावात वसंत शिंदे यांचा जन्म झाला. वडिलांचे घड्याळाचे दुकान होते घरात पाच भावंड असल्याने आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. पण वसंत शिंदे ५ वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले. जेमतेम ४ थी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वसंत शिंदे यांनी वयाच्या १२ व्या वर्षी हिंदुस्थान फिल्म कंपनीत नोकरी केली. दादासाहेब फाळके यांनी १९२५ साली चतुर्थीचा चंद्र हा मुकपट बनवला, त्यात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली.

vasant shinde actor
vasant shinde actor

भक्त प्रल्हाद, संत जनाबाई अशा मुकपटातून ते झळकले होते. वयाच्या २० व्या वर्षी शांताबाई जगताप यांच्यासोबत त्यांनी लग्न केले. मुकपटातून त्यांना ५ ते ८ रुपये एवढे मानधन मिळायचे. पुढे नाटकातून १० ते २० रुपये मिळू लागले. २० ऐवजी २५ द्या म्हणून हे पैसे त्यांनी वाढवून मागितले मात्र लोंढेनी नकार दिला तेव्हा राजाराम सोडण्याचा निर्णय घेतला. मेरा नाम जोकर या चित्रपटात जोकरला आईच्या मृत्यूवेळी काम करावं लागलं होतं हा प्रसंग माझ्या आयुष्यात घडला होता हेही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलं होतं. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मल्हारी मार्तंड, थांब लक्ष्मी कुंकू लावते. अशा चित्रपटातून वसंत शिंदे यांनी लता अरुण, मधु कांबिकर, पुष्पा भोसले अशा अनेक नायिकांसोबत काम केलं​.​

चित्रपटातील बहुतेक नायिका या आपल्या मुलीच्याही वयापेक्षा कमी वयाच्या होत्या​. पण त्यांना कधीच अगं तुगं ची भाषा त्यांनी वापरली नाही असे ते म्हणत. प्रभाकर मुजुमदार यांनीच त्यांना अण्णा हे नाव दिलं होतं. चित्रपटात जरी ते घरगड्याची भूमिका करत असले तरी ते त्या कुटुंबाचा आधार बनले होते. आपल्या ७५ वर्षांच्या कारकिर्दीत वसंत शिंदे यांनी विनोदी भूमिका गाजवल्या. ४ जुलै १९९९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधू पोतदार यांनी शब्दांकन करत विनोदवृक्ष हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.