विराजस कुलकर्णी दिग्दर्शित व्हीक्टोरिया हा मराठी चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी सृष्टीत एक थरार पूर्ण असा भयपट पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली, अनेकांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले होते. हा भयपट असल्याने त्यातील थरार दृश्ये पाहून अंगावर काटा आला अशीही प्रतिक्रिया मिळाली होती. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. यानिमित्ताने आशय कुलकर्णीने मीडियाशी एक मुलाखत दिली.
चित्रपटातील अनुभव आणि बालपणीच्या आठवणी तो दिलखुलासपणे सांगताना दिसला. आपल्या बालपणीची प्राणी पाळण्याची हौस कशी पूर्ण झाली याबाबत त्याने एक खुलासा केला. लहानपणी घरात कुत्रा पाळायचा अशी आशयची एक ईच्छा होती. त्याने कुत्रा समजून डुकराचेच पिल्लू उचलून घरी आणले होते. घराच्या गॅलरीत ठेवून तो झोपायला गेला. आशयचे बाबा कामावरून घरी आले. त्यांना कसला तरी आवाज आला म्हणून ते इकडे तिकडे शोधू लागले. आवाजावरून बहुतेक उंदीर घरात शिरला असावा अशी कल्पना करून त्यांनी गॅलरीचे दार उघडले. तर गॅलरीत असलेले ते डुकराचे पिल्लू सैरभैर झाले आणि घरभर फिरू लागले. देवघरातील देव पडून ते पिल्लू जिथे जाता येईल तिथे घरात पळत सुटले. यानंतर मात्र बेडरूममध्ये असलेल्या आशयला त्यांनी मारण्यास सुरुवात केली.
आशय झोपेतच असल्याने काय घडलंय याची काहीच कल्पना नव्हती, म्हणून तो आईचा धावा करू लागला. बाबा मला का मारतायेत, असे म्हणत तो मार खाण्यापासून स्वतःला वाचवत होता. मात्र आशयच्या आईला सुद्धा काय चाललंय हे कळत नव्हते. यानंतर मात्र आशयने घरात कधीच कशाचे पिल्लू आणले नाही. त्याची आई अनेकदा पिल्लू पाळण्याबद्दल विचारायची, पण तो नाही म्हणायचा. कारण पिल्लू आणलं की आपल्याला मार भेटेल या भीतीने त्याने कधीच कुठले पिल्लू आणले नव्हते. व्हीक्टोरिया चित्रपटातून आशय प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकला आहे. माझा होशील ना मालिकेत विरोधी व त्यानंतर पाहिले न मी तुला मालिकेत तो प्रमुख भूमिका साकारताना दिसला. सहाय्यक भूमिका ते प्रमुख भूमिका असा आशयचा अभिनय क्षेत्रातील प्रवास फारच उल्लेखनीय ठरला आहे.