मराठी चित्रपटाची नायिका ते चरित्र अभिनेत्री अशा भूमिकेतून निशिगंधा वाड प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसल्या आहेत. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांसोबतच त्यांनी हिंदी चित्रपट तसेच मालिका देखील गाजवल्या आहेत. अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या निशिगंधा वाड या शालेय जीवनात अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात. नाटकात सक्रिय असूनही दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून बोर्डात नंबर मिळवला होता. अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक मुलींना दत्तक घेऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. त्यांच्या आई डॉ विजया वाड या शिक्षिका, लेखिका म्हणून परिचयाच्या आहेत.

आपल्या दोन्ही मुलींना त्यांनी संस्कार आणि शिस्तीचे धडे तर दिलेच. मात्र या समाजाचे आपण काही देणे लागतो या हेतूने त्यांनी आपल्या मुलींना सढळ हाताने मदत करण्यासही शिकवले. निशिगंधा वाड आणि विजया वाड यांच्या अनेक मुलाखतीतून तुम्हाला दोघी मायलेकीतील नात्याचा उलगडा होईल. अशाच एका मुलाखतीत निशिगंधा वाड यांनी बालपणीचा एक किस्सा सांगितला होता. निशिगंधा यांच्या घरी एक आजोबा भंगार न्यायला यायचे. त्यावेळी आजोबांची परिस्थिती पाहून, दया येऊन निशिगंधा यांनी हिऱ्याचे कानातले देऊ केले होते. मात्र त्यानंतर त्या कुड्या शोधण्यासाठी घरात पुरता गोधळ उडाला होता. त्यांच्या आईतर अक्षरशः रडकुंडीला आल्या होत्या. कारण त्या कुड्या आजीच्या होत्या म्हणजेच आईच्या आईने दिलेल्या होत्या.

निशिगंधा वाड शाळेतून घरी आल्या मात्र समोरचे दृश्य पाहून घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांना अंदाज आला. मात्र यावर बोलण्याचे धाडस त्यांना होईना. परंतु त्यांच्या आईच्या हे लक्षात आले होते, म्हणून त्यांनी निशिगंधाला बाजूला घेऊन घडलेल्या प्रकरणावर बोलते केले. तेव्हा त्यांनी सगळं खरं खरं सांगून टाकलं. त्यानंतर बरेच दिवस या दोघी त्या आजोबांची वाट पाहू लागल्या. एकेदिवशी ते आजोबा कानातल्या कुड्या घेऊन घरी आले. आईच्या हातात कुड्या देऊन म्हणाले की, हे तुमच्या मुलीने दिले होते. मी काही दिवस आजारी होतो त्यामुळे येऊ शकलो नाही. मी एक वारकरी माणूस आहे. हे परत केले नसते तर पांडुरंगाला काय तोंड दाखवले असते. मुलीला काही बोलू नका. आजोबा गेल्यावर आईने निशिगंधाला एक वाक्य बोलून दाखवले, बेटा प्रत्येकाने दान करावे मात्र ते स्वतः कमावलेल्या संपत्तीमधून.