Breaking News
Home / जरा हटके / ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन.. मराठी सृष्टीने व्यक्त केली हळहळ
rekha meena chitra navathe
rekha meena chitra navathe

ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन.. मराठी सृष्टीने व्यक्त केली हळहळ

ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रा नवाथे गेल्या काही वर्षांपासून आजारी होत्या, वृद्धापकाळाने अंथरुणाला खिळून होत्या. पायाला दुखापत झाल्याच्या निमित्ताने त्यांना काही वर्षांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर एकाकी जीवन जगत असलेल्या चित्रा यांनी वृध्दाश्रमाचा आश्रय पत्करला होता. त्यांची बहीण रेखा कामत यांचे देखील काही महिन्यांपूर्वी निधन झाले. चित्रा नवाथे आणि रेखा कामत या दोघी बहिणींनी लाखाची गोष्ट या चित्रपटातून मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. या चित्रपटातील नाव या दोघींनी पुढे आत्मसात केले होते.

rekha meena chitra navathe
rekha meena chitra navathe

घरची परिस्थिती बेताची असल्याने दोघी बहिणी नाटकातून काम करत असत. यातून मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ज्येष्ठ अभिनेत्री मीना नाईक ही त्यांची धाकटी बहीण आहे, तर मनवा नाईक त्यांची भाची आहे. पोर बाजार, अगडबम, बोक्या सातबंडे, टिंग्या अशा चित्रपटातून त्या आजीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. १९५१ साली लाखाची गोष्ट हा त्यांनी प्रमुख नायिका म्हणून पहिला चित्रपट साकारला होता. त्यानंतर वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलविता धनी या चित्रपटात त्यांनी नायिकेच्या भूमिका बजावली. तर बोक्या सातबंडे, अगडबम, टिंग्या या चित्रपटात त्यांनी आज्जीच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रा यांचे लग्न सह दिग्दर्शक राजा नवाथे यांच्यासोबत झाले होते.

rekha kamat chitra navathe
rekha kamat chitra navathe

राज कपूर यांच्या ‘आह’ चित्रपटाचे सह दिग्दर्शक म्हणून राजा नवाथे काम सांभाळत होते. चित्रा यांना या चित्रपटातील एका गाण्यात नृत्य करायचे होते, इथेच या दोघांची ओळख झाली. लग्नानंतर मात्र त्यांनी चित्रपटातून खूप कमी काम केले. मधल्या काळात पती आणि मुलाच्या निधनाने त्या एकाकी झाल्या. जुहू येथे बंगला असूनही पायाला दुखापत झाल्याने आणि पुढे वृद्धापकाळात हालचाल होत नसल्याने त्यांनी वृध्दाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या तिथे पलीकडे हे गाणं चित्रा नवाथे यांच्यावर चित्रित झालं होतं. लाखाची गोष्ट या चित्रपटाने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.