सध्या सगळीकडे चर्चा आहे ती गौतमी पाटीलच्या नावाची. राज्यभर कार्यक्रम करणारी गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच फॉर्ममध्ये आलेली आहे. अनेक ठिकाणी तिला कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात येऊ लागले आहे. मात्र आता गौतमीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच गौतमी मराठी चित्रपटातून नायिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घुंगरू हा तिचा पहिला वहिला मराठी चित्रपट लवकरच पूर्णत्वास येत आहे. या चित्रपटाचे अर्धे शूटिंग जवळ जवळ पूर्ण झाले आहे.
हंपी, सोलापूर, माढा अशा देशभरातील ठिकाणी तर थायलंड सारख्या परदेशात देखील चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. चित्रपटाची निर्मिती तसेच लेखन बाबा गायकवाड यांनी केले आहे. चित्रपटात गौतमी पाटील सोबत कोण झळकणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. यावरचा पडदा आता हटला असून चित्रपटाचे लेखक आणि निर्माते बाबा गायकवाड हेच मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बाबा गायकवाड यांनी कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून काम केले होते. राजकारण आणि समाजकारणाची देखील त्यांना आवड आहे. घुंगरू चित्रपटात शीतल गीते, सुदाम केंद्रे, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण, वैभव गोरे हेही कलाकार झळकणार आहेत. कलावंताच्या जीवनावर भाष्य करणारा घुंगरू असणार आहे.
कलावंतांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न बाबा गायकवाड यांनी केला आहे. चित्रपट निर्मितीसाठी तब्ब्ल दीड कोटींचा खर्च आला असेही सांगितले जात आहे. बाबा गायकवाड हे इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी या गावचे सुपुत्र. बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतून त्यांनी रघुची भूमिका गाजवली होती. या भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहेत. बराच काळ मालिकेत सक्रिय असलेले पाहायला मिळाले होते. आता ते चित्रपटातून गौतमी पाटील सोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्या पुन्हा एकदा चित्रपटातून झळकणार असल्याने प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.