मराठी सृष्टीत जशी लग्नाची धामधूम सुरू आहे तिथेच आतास कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन ही होत आहे. मराठी चित्रपट मालिका अभिनेता विजय आंदळकर आणि रुपाली झनकर यांनी देखील गोड बातमी देत लवकरच आई बाबा होत असल्याचे जाहीर केले होते. या सोबतच आता मराठी सृष्टीतील आणखी एका कलाकाराची जोडी होणाऱ्या बाळाचे पालकत्व स्वीकारण्यास सज्ज झालेले पाहायला आहेत. अभिनेता ऋषीकेश शेलार आणि अभिनेत्री स्नेहा काटे शेलार या दोघांनी बेबी शॉवरचे फोटो शेअर करत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेत ऋषीकेश दौलतरावचे पात्र साकारत आहे. विरोधी भूमिका असल्याने ऋषीकेशला प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसून येते. सावित्रीजोती, स्वराज्यजननी जिजामाता, छत्रीवाली, शांतेचं कार्ट चालू आहे, लक्ष्मी सदैव मंगलम या गाजलेल्या मालिका आणि नाटकातून ऋषीकेश महत्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. डॉ तात्या लहाणे, जिंदगी विराट, पॅरिस या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली होती. आजवरच्या भूमिकांपैकी दौलतरावची भूमिका कारकिर्दीत अधोरेखित करणारी ठरली आहे. नायका इतकिच खलनायकाची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते, हे त्याने अभिनयातून दाखवून दिले आहे.
ऋषीकेशची पत्नी स्नेहा काटे शेलार ही देखील मराठी मालिका, नाटक तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे. डॉ बी आर आंबेडकर या मालिकेत ती महत्वाची भूमिका साकारत होती. मात्र बाळाच्या आगमनाच्या चाहूल लागताच विश्रांतीसाठी मालिकेतून काढता पाय घेतला. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील शेफाली म्हणजेच अभिनेत्री काजल काटे ही स्नेहाची धाकटी बहीण आहे. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना या दोघींनी मराठी मालिका सृष्टीत चांगलाच जम बसवला आहे. लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत एकत्रित काम करताना ऋषीकेश आणि स्नेहाचे सूर जुळून आले, त्यानंतर त्यांनी लग्नाची गाठ बांधली. हे दोघेही बाळाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत. स्नेहाच्या बेबी शॉवरच्या फोटोंवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.