सोशल मीडियावर कधी काय ट्रेंडमध्ये येईल हे कोणालाही सांगणं तसं कठीणच. मात्र हा ट्रेंड जसजसा सोशल मीडियावर व्हायरल होतो तसतसे नेटकरी देखील या मोहिमेत सहभागी होताना दिसतात. आता नुकताच मराठी सेलिब्रिटी विश्वात एक ट्रेंड सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. या ट्रेंडमध्ये सेलिब्रिटींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत घरापासून दूर राहून स्वतःच्या जवळ कसे गेलो याच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. एकमेकांना टॅग करून या सेलिब्रिटींनी घरापासून दूर राहत त्या दिवसाच्या आठवणींचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा ट्रेंड दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमे याने सुरू केला.
घरापासून दूर राहताना त्याने लंडनची एक खास आठवण सांगितली. केंट युनिव्हर्सिटी, लंडन मध्ये मी माझं एम एस्सी पूर्ण करायला दोन वर्षे होतो. त्या दोन वर्षांनी माझं अख्ख आयुष्य बदलून गेलं. घरापासून दूर गेल्यावर आपण स्वतःच्या अजून जवळ जातो एवढं नक्की. हॅशटॅग घरापासून दूर असे म्हणत हेमंतने हा ट्रेंड सुरू केला आणि अवघ्या काही तासातच या ट्रेंडला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. अगदी सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, तेजस्विनी पंडित, सुयोग गोऱ्हे यांना त्याने घरापासून दूर राहिल्याच्या आठवणींबद्दल विचारलं आहे. हा ट्रेंड सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे पाहून ललित प्रभाकर, रसिका सुनील, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर, मुग्धा कर्णिक यांनी आठवणी शेअर केल्या.
अभिषेक देशमुख, क्षितिज पटवर्धन, पार्थ केतकर, अमेय बर्वे यांच्या घरापासून दूर राहिलेल्या आठवणी खूपच बोलक्या आहेत. आई कुठे काय करते मधील यश म्हणजेच अभिषेक देशमुखने देखील १० वी नंतर पुण्यात आल्याचा किस्सा सांगितला. घरापासून दूर, २००४ साली १० वी नंतर मी घराबाहेर पडलो, पुण्यात आलो. माझे जळगावचे मित्र माझ्याबरोबर होते. पुढची ५ वर्ष आर्कीटेक्चर साठी मुंबईत होस्टेलला राहीलो. पण घरापासून दूर मी एकटाच नव्हतो, माझे अनेक मित्र वेगवेगळ्या गावातून, शहरातून, राज्यातून आले होते. रात्रभर जागून केलेले सबमिशन भाऊचा धक्का, डॅाकयार्ड गोराईचा पॅगोडा, सोबो बॅंडस्टॅंड, काला घोडा फेस्ट अशा अनेक साईट विजीट होत्या.
शहर पालथं घातलं, हे शहरच घर झालं. मी घरापासून दूर असताना काही मित्रांनी त्यांच्या घरात सामावून घेतलं. वांन्द्रे कलानगरचा सपाट वेस्टर्न हायवे बघून जळगावच्या घराची आठवण यायची आणि पोटात खड्डा पडायचा. घरापासून दूर राहील्यावर घराची किंमत कळतेच पण माणसं, शिक्षक, मित्र मनात कायमस्वरुपी घर करून राहतात हे लक्षात आलं. अभिषेकने देखील त्याच्या काही सहकलाकारांना टॅग करून तुमची घरापासून दूर राहिलेली गोष्ट आवडेल ऐकायला असे म्हटले आहे. त्यामुळे हे सर्व सेलिब्रिटी आता एकमेकांना टॅग करून त्यांच्या घरापासून दूर राहिलेल्या गोष्टी शेअर करत आहेत. प्रेक्षकांना देखील त्यांचा हा स्ट्रगल पाहून त्यांचे मोठे कौतुक वाटत आहे.