आज शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने चित्रपटगृहात सवलतीच्या दरात तिकीट विक्री चालू आहे. जिथे २०० हुन अधिक तिकीट दर आकारण्यात येतो. त्याठिकाणी आज प्रत्यक्षात प्रेक्षकांना केवळ ७५ रुपये देऊन चित्रपट पाहायला मिळत असल्याने चित्रपट गृहात तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. एमआयएने १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिवस निमित्त तिकीट दर कमी केला होता. मात्र याला अनेकांनी विरोध दर्शवला. जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता यावा यासाठी ही तारीख पुढे ढकलण्यात आली.
आज २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करण्यात आला. भारतातील जवळपास ४ हजाराहून अधिक सिनेमागृहात केवळ ७५ रुपये देऊन सिनेमा पाहायला मिळत आहे. अगदी आयनॉक्स, सिटीप्राईड, कार्निव्हल, एशिया, डिलाईट, मुव्ही टाईम यासारख्या चित्रपट गृहांनी सिनेमाचे तिकीट दर कमी करून प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घातली आहे. या सुविधेचा लाभ मराठी चित्रपटांना देखील झालेला पाहायला मिळतो आहे. आजचे हे सिनेमाचे दर प्रेक्षकांची गर्दी खेचून आणत असल्याने एक प्रश्न उपस्थित होत आहे. अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे याने या निर्णयाचे स्वागत केले असले तरी या दरावरून मात्र त्याने एक प्रश्न उपस्थित केला आहे.
चित्रपटाचे दर प्रेक्षकांना परवडत नाहीत म्हणूनच ते चित्रपट गृहात यायला टाळाटाळ करतात. जर हे दर कमी केले जातील तर प्रेक्षक नक्कीच सिनेमागृहात गर्दी करू शकतात. एक विरंगुळा म्हणून सर्वसामान्य माणूस चित्रपटाकडे खेचला जातो. मनोरंजनाचे हे एकमेव साधन म्हणून मानण्यात आले. असे असले तरी केवळ पैशा अभावी काहींना चित्रपट पाहता येणे शक्य नसते. हा दर कमी केला तर प्रेक्षक चित्रपट गृहाकडे आपोआप खेचले जातील. चित्रपट गृहात प्रेक्षक येत नाहीत अशी जी ओरड सगळीकडे सुरू आहे. त्याचे मूळ कारण शोधले तर हा मुद्दा देखील ग्राह्य धरण्यात यावा. हेमंत ढोमेने उपस्थित केलेला हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
हा मुद्दा जितेंद्र जोशी, वैशाली सामंत, सुहृद गोडबोले यांना देखील पटला आहे. मुळात चित्रपटाचे दर हे वाढीव तर आहेतच पण त्याचबरोबर तिथे मिळणाऱ्या पॉपकॉर्नचा खर्च अधिक असल्याचे सर्वांनी म्हटले आहे. त्यामुळे कुटुंबाला सोबत घेऊन चित्रपट पाहायचा असेल तर ते सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. याचा विचार केवळ चित्रपट गृहांनीच न करता निर्माते आणि कलाकारांनी देखील करावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हेमांतचा हा मुद्दा सोशल मीडियावर उचलून धरलेला पाहायला मिळतो आहे.