डॉक्टर बनून गावातील महिलांचे पैसे लुटणारा आणि त्यांचे खून करणारा डॉ अजितकुमार देव देवमाणूस या मालिकेतून घराघरात पोहोचला. देवमाणूस या मालिकेच्या पहिल्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग लवकरच येणार अशी चर्चा आहे. गावात सुंदर महिला दिसली की तिच्यासमोर गोड गोड बोलून तिला जाळ्यात ओढायचं. खोट्या प्रेमात फसवायचं. तिला लग्नाचं आमिष दाखवायचं. तिचे दागिने, जमीन, पैसा लुटायचा आणि शेवटी तिचा खून करायचा. देवमाणूस बनून मुखवटा घालून फिरणारा अजित कुमार देव प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. देवमाणूस या मालिकेने पहिल्या भागात तर टीआरपीचे सगळे रेकॉर्ड मोडले.
दुसऱ्या भागाची भट्टी काहीवेळा बिघडली, पण तरीही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात मालिकेचं दुसरं पर्वही यशस्वी झालं. आता या मालिकेविषयी नवी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे देवमाणूसचे चाहते खूपच खुश झाले आहेत. देवमाणूस मालिकेचा पहिला भाग जेव्हा संपला तेव्हा डॉ अजितकुमार उर्फ देवीसिंग मरत असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र त्याचा मृतदेह न दाखवल्याने प्रेक्षकांना या मालिकेचा दुसरा भाग येणार याचा अंदाज आला. पहिल्या पर्वाच्या यशानंतर काही महिन्यातच देवमाणूसचा दुसरा सीझन आला. दुसऱ्या भागात अजितकुमार राजस्थानमधून नटवरलाल बनून गावात आल्याचं दाखवण्यात आलं. पुन्हा एकदा नटवरचा तोच खेळ सुरू झाला.
ज्यामध्ये त्याने पुन्हा महिलांचे खून केले. पहिल्या भागात इन्स्पेक्टर दिव्या सिंगकडून देवमाणसाचा खेळ खल्लास होईल असं वाटत होतं. पण दिव्याला काही त्यानं थांग लागू दिला नाही. पण दुसऱ्या भागात इन्स्पेक्टर जामकरच्या जाळ्यात तो अडकला. त्यात डिंपलशी डॉक्टरचं लग्न झाल्यानंतर तिलाही त्याचं वागणं असह्य झालं. आई होणार असलेल्या डिंपलने डॉक्टरच्या विरोधात साक्ष दिली आणि अखेर डॉक्टरला फाशी झाली. केस आणि दाढी वाढलेले फोटो पाहून आता देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मालिकेच्या निर्माती श्वेता शिंदे हिने याबाबत काहीच जाहीर केलेलं नाही. किंवा कलाकारांकडून याला दुजोरा मिळालेला नाही.
मात्र जर देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग आला तर फाशी दिलेला डॉ अजितकुमार उर्फ नटवर कसा परत येणार हा प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनात डोकावत आहे. अर्थात याचं उत्तर जर या मालिकेचा तिसरा भाग आला तरच मिळणार आहे. अजूनही डॉ अजितकुमार देव याच्या भूमिकेत किरण गायकवाड याने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. प्रमुख भूमिकेतील किरणचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. या मालिकेतील सरू आजीच्या शिव्यांनी तर खूपच प्रसिध्दी मिळवली.