जिगिशा निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे लेखन प्रशांत दळवी यांनी केलं आहे. नवीन टीम आणि नव्या संचातल्या चारचौघी घेऊन रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चार स्त्री व्यक्तिरेखा, त्यांच्या आयुष्यातले प्रत्यक्ष रंगमंचावर येणारे तीन पुरुष आणि विंगेतली अनेक पात्रं असं हे विस्तारित नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकातून कादंबरी कदम बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात दाखल होत आहे. वयाच्या अवघ्या ३ ऱ्या वर्षापासूनच कादंबरी बालनाटकातून काम करत होती.
एका बालनाट्यातून तिने चिमणीच्या पिल्लाची भूमिका साकारली होती. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमातून ती नेहमी सहभाग दर्शवायची. इंद्रधनुष्य या झी मराठी वरील मालिकेतून तीला आशा काळे यांच्या मुलीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत लोकप्रियता मिळाल्यानंतर कादंबरीला कभी सौतन कभी सहेली, केहता है दिल या हिंदी मालिकेत काम मिळाले. अकल्पित, दीप स्तंभ, ह्या गोजिरवाण्या घरात, अवघाची संसार, तुजवीण सख्या रे अश्या गाजलेल्या मालिकांमधून कादंबरीला चांगली प्रसिद्धी मिळत गेली. तीन बहुरानीयां या हिंदी मालिकेतून तिने जानकी देसाईची भूमिका साकारली होती. २०१६ साली अविनाश अरुण या सिनेमॅटोग्राफर सोबत ती विवाहबद्ध झाली.
दृश्यम, किल्ला, हिचकी, कारवाँ अशा हिंदी, मराठी चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर म्हणून अविनाशने काम केले आहे. कादंबरी आणि अविनाश या दोघांना एक मुलगाही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कादंबरी अभिनय क्षेत्रापासून दूर होती. द सायलेन्स आणि भूमिका मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली मात्र मुलाच्या पालनपोषणाच्या जबाबदारीमुळे तिने कमी प्रोजेक्टमध्ये काम केले. कादंबरी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. आपल्या लेकासोबत म्हणजेच कार्तिकसोबत ती नेहमी वेळ घालवताना दिसते यासोबतच मराठी सृष्टीतील तिच्या मैत्रिणीचीही ती नेहमी भेट गाठ घेत असते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता पुन्हा एकदा कादंबरी रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली आहे.
चार चौघी हे नाटक १५ ऑगस्ट १९९१ साली पहिल्यांदा रंगमंचावर आलं होतं. त्यानंतर तब्बल ३१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंच गाजवताना दिसणार आहे. या नव्याने दाखल होत असलेल्या नाटकातून कादंबरी महत्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. नाटकातील चार पात्रांवरचा पडदा हटला असला तरी या चौघींच्या आयुष्यात येणाऱ्या तिघांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही तीन पात्र कोणकोणते कलाकार निभावणार याची प्रतीक्षा आहे. तूर्तास ता नाटकाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.